(फोटो- भावना गवळी, ट्विटर )
जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला देशभरात बऱ्यापैकी धक्का बसला. भाजपला स्वबळावर बहुमत देखील गाठता आले नाही. दरम्यान महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. यंदाची लोकसभा निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्रितपणे लढले. एकत्रित लढण्यामुळे अनेकांना आपल्या उमेद्वारीपासून दूर राहावे लागले. यामध्ये शिवसेनेच्या तत्कालीन खासदार आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांचा समावेश होता. तिकीट कापल्याचे खदखद त्यांच्या मनात सजून असल्याचे पाहायला मिळाले. एका कार्यक्रमात त्यांनी हेमंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
नांदेड येथे कुणबी मराठा महासंघाचा मेळावा पार पडला. या कर्यक्रमात त्या बोलत होत्या. लोकसभेला मी पाचवेळा निवडून आले. कदाचित यावेळेस मी निवडून आले असते तर, केंद्रात मी मंत्री राहिले असते, अशी खदखद भावना गवळी यांनी व्यक्त केली आहे. आजच्या मेळाव्यातील भाषणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मेळाव्यात भावना गवळी यांचे भाषण अधिक चर्चेत राहिले.
आपल्या भाषणात बोलताना आमदार भावना गवळी म्हणाल्या, ”विदर्भातील मुली निश्चितच चांगल्या आहेत. मात्र मराठवाड्यातील जावई येऊन तिकडे कब्जा करत आहेत असे म्हणत, आमदार भावना गवळी यांनी माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नीला देण्यात आलेल्या उमेदवारीवरून निशाणा साधला आहे. विदर्भाची माणसे प्रेमळ असतात. त्यामुळे विदर्भातील मुली मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहेत. आपण सर्व सगेसोयरे आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगेसोयऱ्याचा विषयही हाताळतील”, असे गवळी म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून ऐनवेळी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले होते. यामुळे भावना गवळी नाराज होत्या. मात्र शिवसेनेकडून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. मात्र आमदार झाल्यावर देखील खासदारकीची तिकीट न दिल्याची सल मनात भावना गवळी यांच्या मनात कायम असल्याचे आजच्या भाषणात पाहायला मिळाले.