Narhari zirwal- Ajit Pawar
नाशिक : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मतभेदाची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे नरहरी झिरवाळ सातत्याने चर्चेत असतात. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत झिरवाळांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार संदीप गुळवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय़ घेतला आहे. संदीप गुळवे हे ठाकरे गटाचे उमेदवार असून झिरवाळ गुळवे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.
गुळवे यांना पाठिंबा देण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. गुळवे यांच्या कुटूंबियांशी आपले वैयक्तिक संबंध असल्याने आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहेत. पण राजकीय भूमिका आणि वैयक्तिक संबंध वेगवेगळे विषय आहेत. राजकारणात वैयक्तिक संबंधांपेक्षा राजकीय भूमिका महत्त्वाचे असतात. त्यामुळे गुळवे यांना पाठिंबा देण्याचा विषय सध्या चर्चेत आला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत दरी पडली आहे. भाजप, आरएसएस, आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांच्यावर आरोप होत असल्याने त्यांच्या आमदारांमध्येही नाराजीचा सूर आहे. या सर्व गदारोळात झिरवळ यांनी वाट बदलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे महायुतीचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा आघाडीतील नेते करत आहेत. अशातच झिरवाळ यांच्या या भूमिकेने त्याला दुजोरा मिळत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.