मुंबई : सरकारने सर्व उत्सव निर्बंधामुक्त साजरे करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपकडून मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पाठोपाठ नवरात्रोत्सवही जल्लोषात साजरा होणार आहे. भाजपच्या वतीने नवरात्रीची जय्यत तयारी सुरू असून, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्यासह गायिका बेला शेंडे, गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरांची बरसात होणार असून या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते पुष्कर श्रोती करणार आहेत. त्यामुळे यंदा भाजपाकडून नागरिकांची मने जिंकण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव दणक्यात साजरा केला जाणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या तयारीबाबत आणि आयोजित कार्यक्रमांची माहिती मुंबई भाजपतर्फे देण्यात आली. यावेळी अवधूत गुप्ते, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले की, ‘दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या नंतर आता मुंबई भाजपकडून नवरात्रोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. शिवडीच्या अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानावर हा उत्सव आयोजित करण्यात आला असून मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाईल, अशी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान कार्यक्रम होणार आहे. शेवटच्या २ दिवसात सरकार १२ पर्यंत परवानगी देईल. १ ऑक्टोबरला वैशाली सामंत तसेच यानंतर अनेक कलाकार उपस्थित राहतील. प्रत्येक व्यक्तीला पास घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जांबोरी मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स आणि अभ्युदय नगर या तीन जागांचा विचार करण्यात आला होता. मात्र, अखेरीस अभ्युदय नगरचा पर्याय भाजपने स्वीकारला आहे. अभ्युदय नगर येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमात दररोज १० ते १५ हजार मुंबईकर सहभागी होतील, असा आम्हाला विश्वास आहे. अवधूत गुप्ते आणि त्यांच्या टीमच्या सादरीकरणामुळे हा उत्सव आणखी मोठा होईल अशी आशा आहे.’ असे कोटेचा यांनी सांगितले.
तर असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, मुंबईत दांडियाचा मोठा कार्यक्रम व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच अवधूत गुप्ते यांच्यासह आम्ही दांडियाची आयोजन केले आहे. भाजपच्या या कार्यक्रमाला मुंबईकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी आम्हाला आशा आहे.
[read_also content=”औसा-भादा-मुरूड रस्त्याचे काम लवकरच पुर्ण केले जाईल : आमदार रमेश कराड https://www.navarashtra.com/maharashtra/ausa-bhada-murod-road-will-be-completed-soon-mla-ramesh-karad-nrdm-329706.html”]
मुंबईत भाजपकडून मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आल्याचा मला मनापासून आनंद आहे. या कार्यक्रमात मला सलग गायला मिळणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सुर नवा ध्यास नवा च्या प्लॅटफॉर्म वर मी गरब्याचा ‘भोंडला’ हा गीतप्रकार गायला होता. त्यामुळे या कार्यक्रमात देखील मी ‘भोंडला’ गाणार असून यासोबत मराठी गीतांसह हिंदी, गुजराती आणि इतर गाण्यांनाही आम्ही प्राधान्य देउ असे अवधूत गुप्ते यांच्याकडून सांगण्यात आले.