पंकजा मुंडे नवा पक्ष काढणार? छगन भुजबळ यांनी सांगितलं मुंडेंनी कधी पक्ष काढण्याची व्यक्त केली होती इच्छा?
“भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील”, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, स्वर्गीय मुंडे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट सांगू शकतो. मी उपमुख्यमंत्री होतो, २००२ ची ही गोष्ट. गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले आणि म्हणाले एक वेगळा पक्ष काढू, तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू. पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, मी उपमुख्यमंत्री होतो मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते त्यांना राजीनामा द्यावा लागेल म्हटलं. मी सांगितले मला काही हरकत नाही. इतर लहान घटकांना घेऊन पक्ष निघत असेल तर हरकत नाही म्हटलं. नंतर त्यांनी तो विषय सोडून दिला. आता कोणीही पक्ष काढू शकतं, एका समाजावर पक्ष काढणे आणि यश मिळवणं हे कितपत यशदायी असेल हे मला वाटत नाही. काही समाजाने पक्ष काढले आपल्या समोर आहे. त्यांनी म्हटलं म्हणून पक्ष काढतील असे नाही . गोपीनाथ मुंडेंना मानणारा वर्ग मोठा आहे असा त्याचा अर्थ आहे. असं मला वाटंत, असं त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावर भुजबळ म्हणाले, मला भेट झाली की नाही माहिती नाही. पण एकनाथ शिंदेही फडणवीसांना भेटत असतात. निवडणुकीसंदर्भात चर्चा असू शकतात. मुंबई महापालिकेबात चर्चा असू शकते.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर भुजबळ म्हणाले, ते ज्या पदावर होते विद्वान ग्रस्थ, कुठं काय बोलायचे हे सांभाळले पाहिजे. ते जे बोलले तिडीक निर्माण झाली. औरंगजेबला कोण लाच देणार. संभाजी महाराजांना काशीला ठेवलं. इतिहास बदलायचा अधिकार कुणी दिला. विद्वान पुरुष ब्राम्हण असतात असे पूर्वी लिहिलं. पण आता अभ्यास करून कुठल्याही समाजाच लोक मोठे झाले. बाबासाहेब दलित समाजात जन्माला आले विद्वत्ता घेऊन जन्माला आले. शाहू महाराजांनी त्यांना मदत केली. विद्वत्तेचा उपयोग पैसे कमविण्यासाठी केला नाही. सगळ्यांना समान न्याय दिला. प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार दिला. नवीन संविधान तयार होते तेव्हा भारताच्या संविधानाचा अभ्यास करतात. चांगलं सांगा, उगीचच अमुक तमुक सांगू नका
विवादास्पद विधान करू नये राग ओढून घेऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला.