पुणे – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. त्यापूर्वी दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली. हे प्रकरण वाढल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले असून गंभीर आरोप केले आहेत.
शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी आपल्या अर्वाच्च भाषेचे स्पष्टीकरण दिले. आमदार भरणे म्हणाले, मी माझ्या मराठी भाषेमध्ये बोललो आहे. मी शिवीगाळ केलेली नाही. मतदान असल्यामुळे मी गावामध्ये फिरत होतो. अंथुर्णे येथे मला कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. कार्यकर्त्यांचे भांडण दिसलं. पैसे वाटप होत असल्याचं मला कळालं. त्यामुळे मी तिथे उतरलो. तो कार्यकर्ता नव्हता. बारामती अॅग्रोमधला तो एक कर्मचारी होता. त्याने गावकऱ्यांविषयी आरेतुरेची भाषा केली. माझ्याविषयी देखील त्याने अपशब्द वापरला, असे भरणे म्हणाले.
पुढे आमदार भरणे म्हणाले, व्हिडिओमधल्या लोकांचे जबाब घ्या. त्यांना विचारा, पैशाचे आमिष, वाटप कोण करत होतं. नोकऱ्यांचे आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगाने या लोकांना विचारावं कोण दबाव टाकत होतं. मी तक्रार करणारा माणूस नाही. पण, कोणी तक्रार केली तर त्याला आम्ही कायदेशीर उत्तर नक्की देऊ. आमच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल तर आम्ही शांत बसणार का? तो कार्यकर्ता नाही, बारामती अॅग्रोचा कर्मचारी आहे. त्याचं मतदान तिथे आहे. पण, तो पैसे वाटप करत होता. आज सहा वाजल्यानंतर तो तिथे दिसणार देखील नाही. आम्ही दिवसरात्र काम करतो, सर्वांच्या मदतीसाठी मी धावून जातो. त्यामुळे तरीही कोणी चुकीचं काम करत असेल, तर माझ्या भावना व्यक्त करणारच,” असे स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.