उरुळी कांचन : हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादीला मोठा दणका भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकास दांगट यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सोसायटी मतदार संघात अकरा पैकी अकरा जागा जिंकुन राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला अन विधानसभा निवडणुकीची लढाई कशी होईल याची चुणूक दाखविली. शिवाय इंदापूर व बारामती तालुक्याच्या मंडळीनी हवेली तालुक्यावर आजपर्यंत केलेल्या अन्यायाला वाचा फोडत हवेली कोणाला बधत नाही हे पण दाखवून दिले असेच म्हणावे लागेल.
भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकास दांगट यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” या सर्वपक्षीय पॅनेलने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा १३ विरुद्ध २ असा दणदणीत पराभव करीत फज्जा उडवला आहे. व्यापारी व हमाल-मापाडी गटातुन तीन उमेदवार स्वतंत्र निवडून आले आहेत.
पुणे जिल्हातच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडात श्रींमत बाजार समिती असा लौकिक असणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हातात याव्यात म्हणून आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के यांच्यासह राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी कंबर कसली होती. मात्र ग्रामपंचायत गटातील केवळ दोन जागा वगळता, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विकास दांगट, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,प्रा. के.डी. कांचन, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” पंधरापैकी तब्बल तेरा जागा जिंकुन नवा इतिहास घडवला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दहा महिण्यापुर्वी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवार विकास दांगट यांनी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे,प्रकाश जगताप,प्रशांत काळभोर यांना हाताशी धरुन विजय मिळवला होता. हाच धागा पकडत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमधील विकास दांगट यांचे सहकारी परत एकदा एकत्र येत, सर्वपक्षीय “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” च्या माध्यमातुन बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समोर खु्दद अजित पवार यांच्यासह त्यांचे चार विद्यमान आमदार निवडणुकीसाठी झटत असतानाही, भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकास दांगट या दोघांनी राष्ट्रवादीला माती चारण्यात यश मिळवले आहे.
दरम्यान या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक पराभाव हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचा मानला जात आहे. ग्रामपंचायत गटातुन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांनी राहुल काळभोर यांचा बावीस मतांनी पराभव केला आहे. राहुल काळभोर यांचे पै-पाहुणे व अजित पवार, प्रदीप कंद, आमदार राहुल कुल यांच्याशी असलेली जवळीक यामुळे राहुल काळभोर यांचा विजय निश्चीत मानला जात होता. मात्र राहुल काळभोर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान राहुल काळभोर यांच्याबरोबरच या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांचे बंधु शेखर सहदेव म्हस्के, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष आबासाहेब कांचन, अशोक सुदाम गायकवाड, योगेश बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय दिनकर चोरघे, कुलदीप गुलाबराव चरवड, संदीप माणिकराव गोते, प्रतिभा महादेव कांचन, सरला बाबुराव चांदेरे या राष्ट्रवादीच्या दिग्गज उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाला सामोरी जावे लागले आहे.
दोन्ही बाजूचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
सोसायटी मतदार संघातील “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल” चे विजयी उमेदवार- रोहिदास दामोदर उंद्रे, दिलीप काशिनाथ काळभोर, प्रशांत दत्तात्रय काळभोर, राजाराम आबुराव कांचन, प्रकाश चंद्रकांत जगताप, नितीन पंढरीनाथ दांगट, दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे, शशिकांत वामन गायकवाड व लक्ष्मण साधू केसकर
महिला विजयी उमेदवार- मनिषा प्रकाश हरपळे, सारिका मिलिंद हरगुडे
ग्रामपंचायत गट- सुदर्शन जयप्रकाश चौधरी, रवींद्र नारायणराव कंद.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे – रामकृष्ण हेमचंद्र सातव, आबासाहेब कोंडीबा आबनावे (ग्रामपंचायत गट)
व्यापारी मतदार संघ- गणेश सोपान घुले व अनिरुध्द शिवलाल भोसले.
हमाल-मापाडी मतदार संघ- संतोष नांगरे