कर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळ कशेळे भीमाशंकर राज्यमार्ग आणि भीमाशंकर रस्त्यावरून अंजप कडाव जिल्हा मार्गच्या बाजूने जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व नियम कायदे धुळीस मिळवून शेकडो एकर जमिनीचे मालकाच्या दिमतीला ती जलवाहिनी टाकली जात आहे.दरम्यान,अशाप्रकारे जलवाहिनी टाकून पेज नदीमधून पाणी उचलण्याची कोणतीही परवानगी नसताना हे काम सुरू असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहे,दुसरीकडे मागील दोन महिन्यापासून रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ठेवले असून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही.
कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या बाजूने पाइपलाइन किंवा केबल टाकण्याची कामे सर्रास होत असतात. त्यात कोणी आवाज उठवला तर राजकीय नेत्यांचे फोन येतात आणि ती बेकायदा कामे अव्याहतपणे सुरूच असतात. रस्त्याच्या कडेला असलेली मातीची साइड पट्टी खोदण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी न घेता जेसीबी मशीनचे सहायाने खोदकाम केले जाते.मोठे मोठे पाईप टाकले जातात आणि त्यानंतर ते खोदकाम पुन्हा पूर्वी होते तसे न करून ठेवता आपले काम झाले की खोदकाम करणारा ठेकेदार पळून जातो.त्यावेळी त्या खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी होतात आणि कधी त्यांचे जीव देखील जातात.मात्र त्यांचे सोयरसुतक कोणत्याही अधिकाऱ्यांना नाही आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला देखील नसल्याचे दिसून येत आहे.मात्र त्याच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे परवानगी न घेता खोदकाम केले जात असताना अधिकारी वर्ग तिकडे फिरकत नाहीत.त्यामुळे खोदकाम केल्याने रस्त्याची साइड पट्टी नादुरुस्त होते आणि त्यानंतर रस्ता देखील नादुरुस्त होतो हे कर्जत तालुक्यात सर्रासपणे सुरू आहे.
टाटा प्रकल्पाच्या वीज केंद्रातून वीज निर्मिती केल्यानंतर पेज नदी मध्ये ते पाणी सोडले जाते.त्या पाण्यावर पाटबंधारे विभागाचा अधिकार आहे असे असताना पेज नदी वरील अंजप कळंबोली जवळील पुलाच्या बाजूने पाणी उचलले गेले आहे.ते पाणी नेण्यासाठी कडाव अंजप रस्त्याने पेज नदीपासून जलवाहिन्या नेण्यात आल्या आहेत.पेज नदी ते अंजप गाव या भागात नेण्यात आलेल्या जलवाहिन्या यांच्यासाठी मागील दोन महिन्यापूर्वी रस्त्याची मातीची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे.पुढे या जलवाहिन्या टाकण्यासाठी नेरळ कशेळे हा भीमाशंकर राज्यमार्ग वरील मातीची बाजू खोदण्यात आली आहे.
त्या ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत पण जलवाहिनी टाकल्यानंतर दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी रस्त्याची मातीची बाजू बुजवून टाकण्यात आलेली नाही.त्यात आता रस्त्याच्या बाजूला पावसाला असल्याने मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे.त्या गवताचा परिणाम कशेळे रस्त्यावरील मातीचा रस्ता खोदला आहे याची माहिती वाहनचालक यांना मिळत नाही आणि त्यामुळे वाहने खड्ड्यात पडण्याच्या अनेक घटना झाल्या आहेत.त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीचा असलेल्या कडाव अंजप आणि नेरळ कशेळे या दोन्ही रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही.असे सर्व बेकायदा कामे सुरू असताना सरकारी अधिकारी मग गिळून गप्प आहेत.
पेज नदीवरील पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेतली जात नाही आणि रस्त्याची मातीचा भाग खोदण्यासाठी बांधकाम खात्याची परवानगी घेतली जात नाही.त्यामुळे वाहनचालक यांना टाकण्याचा आलेल्या जलवाहिन्या कोणा घनदांडग्या लोकांच्या जमिनीवर हिरवे लॉन फुलवण्यासाठी सर्व कायदे मोडून चालल्या आहेत अशी चर्चा सुरू आहे.कर्जत तालुक्यातील अधिकारी याबाबत सकारात्मक विचार करतील काय? अशी चर्चा सुरू आहे.