पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिकांसाठी मोफत बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार ते विद्यापीठातील विविध ठिकाणी बसने (SPPU Bus Service) जाणे शक्य झाले असून, येत्या काळात बससेवेसाठी स्वतंत्र उपयोजन (ऍप्लिकेशन) विकसित करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.
विद्यापीठाला दोन बस दत्तक मिळाल्या होत्या. त्यानंतर विद्यापीठ परिसरासाठी बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, काही कारणाने ती सुरू राहू शकली नाही. विद्यापीठाचा आवार मोठा असल्याने स्वतःचे वाहन नसलेले विद्यार्थी, नागरिकांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विविध ठिकाणी सहज पोहचणे शक्य झाले आहे.
सकाळी साडेदहा वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, की बससेवेसाठी ठिकठिकाणी थांबे करण्यात आले आहेत. सध्या किती विद्यार्थी, नागरिकांकडून या बससेवेचा वापर केला जातो याचा आढावा घेण्यात येत आहे.