तब्बल 7 वर्षांनंतर पाटण पंचायत समिती मासिक सभा; आरोग्य व शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे
पाटण : पाटण तालुक्यात होणारी शिक्षण व आरोग्याची परवड लक्षात घेता या दोन्ही विभागावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक वाडीवस्तीवरील शाळांमध्ये शिक्षकांची असणारी रिक्त पदे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, पटसंख्या, वर्गखोल्या, शिक्षकांची अनियमितता तसेच आरोग्य विभागात असणारी रिक्त पदे, रुग्णसेवा, उपकेंद्रे, लसीकरण, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमी असलेली संख्या याबाबत अनेक सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. उपसभापती विजय पवार यांनी पहिल्याच मासिक सभेत शिक्षण व आरोग्य या दोन्ही विभागांचा सविस्तर आढावा घेत या विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना दिल्या.
तब्बल ७ वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर पाटण पंचायत समितीची पहिली मासिक सभा लोकनेते बाळासाहेब देसाई पंचायत समिती भवनमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती सविता पवार यांच्या अध्यक्षेतखाली पार पडली. यावेळी उपसभापती विजय पवार, गटविकास अधिकारी सरिता पवार, सर्व नवनिर्वाचित सदस्य, विविध विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.
सभेच्या प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विषयानुसार चर्चा करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी शिक्षण विभागाचा आढावा सादर केला. केंद्रप्रमुख, शिक्षक, विस्ताराधिकारी यांची अनेक पदे रिक्त असल्याचे सांगितले. नवीन वर्गखोल्या, काम पूर्ण झालेल्या शाळा, बांधकाम अपूर्ण असलेल्या शाळा याविषयी चर्चा झाली.
यावर बोलताना उपसभापती विजय पवार यांनी पाटण तालुका दुर्गम असून, विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत, असे सांगितले. सदस्य पंजाबराव देसाई यांनी दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती पाहून उन्हाळी सुट्टीचा विचार करण्याबाबत शिक्षण विभागाला सुचविले. सदस्य प्रशांत पवार यांनी मोरणा विभागातील शिक्षक शाळेत वेळेवर येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याबाबत शिक्षण विभागाने गांभिर्याने लक्ष देवून शिक्षकांना तशा सूचना देण्याची मागणी केली. विरोधी सदस्य शंकर घाडगे यांनीही शिक्षण विभागाबाबत नाराजी व्यक्त केली. शाळांच्या इमारती जास्त आणि विद्यार्थी संख्या कमी, अशी परिस्थिती आजच्या घडीला निर्माण झाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी शिक्षण विभागाने एखादा उपक्रम सुरू करण्याची मागणी केली.






