ऐन दिवाळीत महापालिकेची जप्ती कारवाई (संग्रहित फोटो)
पिंपरी : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी मोहिमेला गती दिली असून, आतापर्यंत शहरातील तब्बल 27 मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे.
थकबाकीदारांना पूर्वीच वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरल्याने महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईसाठी 18 विभागीय कार्यालयांमार्फत पथके सक्रिय करण्यात आली असून, शहरातील निवासी तसेच बिगरनिवासी थकबाकीदारांवर थेट कारवाई सुरू आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पथकांनी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जाऊन जप्ती प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत 27 मालमत्ता सील करण्यात आल्या असून, काही ठिकाणी नळजोडणी देखील खंडित करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान 125 थकबाकीदारांनी तत्काळ कराची थकबाकी भरून कारवाई टाळली आहे.
हेदेखील वाचा : PCMC News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळी बोनस जाहीर; अधिकारी-कर्मचारी होणार आनंदात
दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि कर आकारणी व संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पुढील महिनाभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
कर वसुलीसाठी महापालिकेकडून कारवाई
थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. या कारवाईत कोणत्याही प्रकारची शिथिलता ठेवली जाणार नाही. मालमत्ता कर थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन खंडीत करणे यासारखी कठोर पावले उचलली जात आहेत.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
कर वसुलीबाबत महापालिकेची आता कठोर भूमिका
महापालिकेने कर वसुलीबाबत आता कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यास जप्तीची कारवाई अपरिहार्य ठरेल. सर्व थकबाकीदारांनी तात्काळ मालमत्ता कराची थकीत रक्कम भरून सहकार्य करावे.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
हेदेखील वाचा : आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर