पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार गटात झालेल्या हाणामारीमुळे गावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोरेगाव : पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेस शरदचंद्र पवार गटात झालेल्या हाणामारीमुळे गावात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पैसे वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ६) काही जणांना पकडले होते. सायंकाळी साडे चारच्या सुमारास तलाठी कार्यालयासमोर हा प्रकार घडला होता.
लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून काहीजण मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती गावातील कार्यकर्त्यांना समजली. ते संबंधित ठिकाणी जाऊन पैसे वाटप होत आहे किंवा नाही याबाबत खात्री करीत असताना दोन्ही गटांत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे काही काळ गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी ही माहिती वाठार स्टेशन पोलिसांना दिली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने राष्ट्रवादी कॉंंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन समोर मोठी गर्दी केली होती.
एसआरपीफचे जवान तैनात
दरम्यान कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी गावात भेट दिली. मंगळवारी (दि. ७) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पार्श्वभूमीवर गावात गेले दोन दिवस पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. दुपारी वाठार पोलिस व एसआरपीफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी (दि. ८) भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार जयकुमार गोरे यांनी तर गुरुवारी (दि. ९) सायंकाळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून घटनेबाबत माहिती घेतली.
Web Title: Police deployment in pimpode budruk village clash between bjp sharad pawar group nrdm