Pune Vidhan Parishad Election 2026: सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन; पुणे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध
पुणे विधान परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटा कडून श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांतर्गत सुनेत्रा पवार यांनी थेट शरद पवार यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानंतर श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, काकडे यांनीदेखील शरद पवार यांच्याशी संपर्क साधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्याची विनंती केली होती. अखेर दोन्ही बाजूंच्या चर्चांना यश आल्याने पुण्यातील निवडणुकीची रंगत संपुष्टात आली असून विक्रम काकडे यांच्या निवडीचा मार्ग सुकर झाला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये समन्वय आणि राजकीय तडजोडींचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.






