सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळेफाटा : रस्त्यावर वाहन चालवताना घेतलेला एक चुकीचा निर्णय किती महागात पडू शकतो, याची प्रचिती देणारी घटना मंगळवारी पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी बसस्थानक चौकात घडली आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत एका कारचालकाने अचानक वळण घेतल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. काही क्षणांतच महामार्गावर भीषण अपघात घडला. या अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ केवळ अपघाताचा थरार दाखवत नसून वाहन चालवताना होणाऱ्या निष्काळजीपणाचे गंभीर परिणामही अधोरेखित करत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारने अचानक दिशा बदलल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकाला वाहनावर नियंत्रण मिळविण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करून गेली आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनांचा वेग लक्षणीय वाढला आहे. वेग, घाई आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. पिंपळवंडी बसस्थानक चौक हा त्यातील संवेदनशील ठिकाणांपैकी एक बनला असून येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
निष्काळजीपणाचा परिणाम
अनेक वाहनचालक इंडिकेटर न देता अचानक लेन बदलतात, तर काही जण मागील वाहतुकीचा अंदाज न घेता वाहन वळवतात. काही सेकंद वाचविण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला जातो. पिंपळवंडीतील हा अपघात त्याच निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे नागरिकांचे मत आहे.
उपाययोजना करण्याची मागणी
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे चौक परिसरात रंबलर स्ट्रिप्स, वेगमर्यादा दर्शविणारे फलक तसेच अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र केवळ प्रशासनाने उपाययोजना करून चालणार नाही, तर प्रत्येक वाहनचालकानेही जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे
रस्त्यावरची घाई एखाद्या कुटुंबासाठी आयुष्यभराच्या वेदनेचे कारण ठरू शकते. घरातून बाहेर पडलेला प्रत्येक व्यक्ती सुरक्षितपणे घरी परतावा यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि संयमित वाहन चालवने हाच सर्वोत्तम पर्याय आहे. पिंपळवंडी चौकातील हा अपघात केवळ एक घटना नसून प्रत्येक वाहनचालकासाठी वेळेवर मिळालेला गंभीर इशारा ठरत आहे.






