पुणे : ऑक्टोबर २०२४ मध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आंध रोड ते सांगवी जोडणारा तिसरा पूल तब्बल ३० कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आला. केवळ एक वर्ष उलटताच, हा पूल आता पुन्हा बंद करण्यात आला असून जवळपास १९ कोटी रुपयांचा खर्च करून त्याचे ‘सौंदर्यीकरण’ करण्यात येणार आहे.
दररोज सरासरी फक्त १५० वाहनांचा वापर असलेल्या या पुलावर आधीपासूनच दोन पर्यायी पूल असल्याने, नागरिकांनी या नव्या खर्चावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेथे रस्त्यांवर खड्डे आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, वाहतूक नियंत्रणाचा अभाव आहे, तिथे एवढ्या कोटींचे सौंदर्यीकरण कशासाठी? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
औंध रोडचे रहिवासी ले.क. प्रवीण श्रीवास्तव (निवृत्त) यांनी सांगितले, पुलाच्या समोरील रस्ता अत्यंत खराब स्थितीत आहे आणि एक मोठा खड्डा अपघाताला आमंत्रण देतो. १९ कोटी खर्च करण्याऐवजी सिग्नल लावणे, पोलिस गस्त वाढवणे, स्पीड लिमिट आणि पार्किंगचे बोर्ड बसवणे अशी कामे करायला हवीत. हा पूल मुळातच आवश्यक नव्हता. आधीच दोन पूल औंध रोड आणि बोपोडीला सांगवीशी जोडतात. तरीदेखील हा पूल बांधला गेला आणि आता पुन्हा त्याच्यावर कोटींचा खर्च केला जात आहे.
भाऊ पाटील रोडचे रहिवासी सेड्रिक पासानाह यांनी सांगितले, पूलाभोवती झाडे आहेत आणि फक्त नदीतला कचरा साफ केला तरी परिसर सुंदर दिसेल. पण पुलावर रात्री बाईक स्टंट, रेसिंग, फटाके फोडणे, रील्स बनवणे अशा प्रकारांमुळे रहिवाशांचा त्रास वाढलाय. सौंदर्यीकरणापेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिस गस्त आवश्यक आहे.
औंध रोडचे संदीप रावल म्हणाले, हा पूल वापरणारे लोक हातभरच आहेत. अशावेळी २० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च निरर्थक वाटतो. हे पैसे सांगवी, भाऊ पाटील रोड आणि आंध रोड परिसरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी वापरायला हवेत.
पुलाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. हा पूल ट्रॅफिक कमी करण्यासाठी बांधला असला, तरी प्रत्यक्षात अंबेडकर चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. सिग्नल वारंवार बंद पडतात आणि वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात.
हेही वाचा : ICC Ranking मध्ये मोठा उलटफेर! विश्वचषक जिंकूनही स्मृती मानधनाला मोठा झटका; लॉरा वोल्वार्ड्ट अव्वल स्थानी
सध्या पुलावर लोखंडी कमान बांधण्याचे काम सुरू आहे. हे ‘सौंदर्यीकरण’ प्रकल्पाचा एक भाग आहे. स्टीलचे जड साहित्य वापरले जात असल्याने पूल काही काळ वाहनांसाठी बंद ठेवला आहे. हा पूल ‘माइलस्टोन प्रकल्प’ असल्याने त्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. सुरक्षेच्या बाबतीत आम्ही वाहतूक पोलिसांना पत्र देणार आहोत. -संध्या वाघ, कार्यकारी अभियंता (प्रकल्प विभाग), पिंपरी चिंचवड महापालिका हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांचा संयुक्त उपक्रम आहे. पुणे महापालिकेने निधी दिला, पण बांधकाम पिंपरी चिंचवड महापालिकेने केले. सध्या सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाबाबत पुणे महापालिकेकडे कोणतीही माहिती नाही. -दिनकर गोजरे, कार्यकारी मुख्य अभियंता, पुणे महापालिका






