डॉल्बीच्या विरोधात ज्येष्ठ नागरिकांची साताऱ्यातून निघणाऱ रॅली (सौजन्य - सोशल मिडीया)
पुणे : वैभवशाली गणेशोत्सवात तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या डीजेंवर पुणे पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्याने यंदा डीजे वाजणार का अन् त्याचा आवाज घुमणार का असा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विसर्जन मिरवणूकीत ‘प्रेशर मोड’ लावून डीजे वाजविल्यास कारवाई करण्याचा इशारा तर दिला आहेच पण डीजे जागीच जप्त करण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच, डीजे मालकांवर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे यंदा मिरवणूकीत नेमका डीजेचा आवाज घुमणार की नाही, हे पहावे लागणार आहे.
वैभवशाली गणशोत्सवात तरुणाईचे मुख्य आकर्षण अन् ताल धरण्यासाठी डीजेच्या समोर असतात. परंतु, गेल्या काही वर्षापासून या कर्णकर्कश आवाजामुळे या डीजे वापरास बंदी करावी अशी मागणी होऊ लागली आहे. यंदा देखील मंडळानी जय्यत तयारी सुरू केली आहे. मिरवणूकीत साऊंड सिस्टीम लावल्या जाण्याची शक्यता आहे. डीजेंसोबत व डोळे दिपवणारे लेझर लाईट लावल्या जातात.
डीजेत सरास ‘प्रेशर मोड’ या उपकरणाचा वापर केला जातो. ज्यामुळे डीजेचा दणदणाट अन् कर्णकर्कश आवाज निघतो. या उपकरणामुळे मात्र, कानठाळ्या बसतील असा आवाज निघतो आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना होतो. न्यायालयाने देखील यासदंर्भात नियम लागू केले आहेत. मात्र, उत्वसात या डीजेंचा सरास वापर होतो.
यंदा मात्र, कडक शिस्तीच्या पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी डीजेवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट दिसल्यास जागीच डीजे जप्तीचे तसेच मालकांवर कारवाई करण्यात येईल, त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जातील असे म्हंटले आहे.
ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरास पोलीसांची परवानगी
ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरास पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीत ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्यांनी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे अर्ज करावेत. परवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल. विनापरवानगी ड्रोन वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
घातक लेझर लाईटवर कारवाई
उत्सवात लेझर लाईटचा वापर होतो. डीजेंवर लाईट लावलेले असतात. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत अनेकांना त्रास झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरमध्ये लेझर लाईटमुळे तिघांच्या डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे या लाईट वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यानंतरही या लाईटचा वापर केल्यास कारवाईचा इशारा दिला असून, प्रसंगी मालकांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे.