विठ्ठलाच्या मूर्तीवर 'प्रभामंडळ' (फोटो- मयुरेश मोकल)
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ
हिरवाईने नटलेल्या घाटात पाहायला मिळाले दिंडीचे नेत्रदीपक दृश्य
विठ्ठलाच्या मूर्तीच्या वर दिसलेल्या या प्रभामंडळाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
सुनयना सोनवणे / पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर दिवे घाट परिसर पुन्हा एकदा लाखो वारकरी आणि छायाचित्रकारांनी गजबजून गेला. पावसामुळे हिरवाईने नटलेल्या घाटातील दिंडीचे नेत्रदीपक दृश्य टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकार दिवे घाटात तासन्तास प्रतीक्षा करत होते. याच वेळी विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अगदी वर सूर्याभोवती तयार झालेल्या प्रकाशाच्या वर्तुळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
दिवे घाटात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वर दिसलेल्या या प्रभामंडळाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक वारकरी, छायाचित्रकार आणि नागरिकांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यामुळे पालखीतील दिंडींच्या देखण्या छायाचित्रांसोबतच हे प्रभामंडळही यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
हे दृश्य पाहून अनेकांनी ते इंद्रधनुष्य, इंद्रवज्र किंवा अन्य नैसर्गिक घटना असल्याची चर्चा केली. मात्र हवामानशास्त्राच्या भाषेत या घटनेला ‘प्रभामंडळ’ किंवा ‘खळे’ असे म्हटले जाते. सूर्याभोवती असे वर्तुळ दिसणे तुलनेने दुर्मिळ मानले जाते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आकाशात सुमारे २० हजार फूट उंचीवर तयार होणाऱ्या ‘सिरस’ या अतिथंड ढगांमध्ये बर्फाचे सूक्ष्म स्फटिक असतात. या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश विशिष्ट कोनातून जाताना त्याचे अपवर्तन (रिफ्रॅक्शन) होते आणि सूर्याभोवती गोलाकार प्रकाशाचे वर्तुळ तयार होते. या वर्तुळाच्या आतील बाजूस फिकट लाल, तर बाहेरील बाजूस निळसर किंवा पांढरट रंगाची छटा दिसते. काहीवेळा त्यामध्ये इंद्रधनुष्यासारखे रंगही उमटतात.
पालखीसोहळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरच हे प्रभामंडळ दिसल्याने अनेक भाविकांनी त्याला आध्यात्मिक अर्थही जोडला. अध्यात्मात देव किंवा पवित्र व्यक्तीच्या भोवती दिसणाऱ्या तेजोवलयालाही प्रभामंडळ असे संबोधले जाते. त्यामुळे दिवे घाटातील हा निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम यंदाच्या पालखी सोहळ्यात विशेष आकर्षण ठरला.
लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’
अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’
आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांमुळे पुणे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि पर्यटनस्थळे गजबजून गेली होती शनिवारवाडा, लालमहाल परिसर, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, कसबा पेठ, मंडई तसेच शनिवार पेठ परिसरात दिवसभर वारकऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांना भेट देतानाच अनेक वारकऱ्यांनी खरेदीचाही आनंद लुटला.






