शरीराच्या निरोगी वाढीसाठी आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन हा अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक मानला जातो. त्यामुळे अनेकजण प्रोटीनसाठी डाळी, अंडी, दूध किंवा मांसाहारावर भर देतात. मात्र, काही फळांमध्येही तुलनेने चांगल्या प्रमाणात प्रोटीन आढळते. अर्थात, फळे ही प्रोटीनचा मुख्य स्रोत नसली तरी संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा समावेश केल्यास शरीराला अतिरिक्त पोषण मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, वजन नियंत्रण, पचन सुधारणा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही ही फळे उपयुक्त ठरू शकतात.
Diabetes: डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोरफडीचा ज्यूस कसा ठरतो लाभदायक? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
पेरु हे प्रोटीनच्या दृष्टीने सर्वाधिक उपयुक्त फळांपैकी एक मानले जाते. यामध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर असते. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना टिकून राहते. संध्याकाळच्या हलक्या आहारात पेरुचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्ससोबतच काही प्रमाणात प्रोटीनही असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. अॅप्रिकॉटमध्ये प्रोटीनबरोबरच पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
कीवीमध्ये प्रोटीनसोबत ‘अॅक्टिनिडिन’ नावाचे एन्झाइम असते. हे एन्झाइम प्रोटीनचे पचन सुलभ करण्यास मदत करते. याशिवाय कीवी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही ओळखले जाते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






