कॉक्रोज जनता पार्टीचे पुण्यात आंदोलन
शिक्षणमत्र्यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतर
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले
आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण
पुणे: परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्था, पेपरफुटी, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील अडचणी याविरोधात विद्यार्थ्यांनी आता रस्त्यावर उतरून आवाज उठविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच शुक्रवारपर्यंत राजीनामा न झाल्यास २० जून रोजी दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन झाले त्यावेळी सोनम वांगचुक, विद्यापीठातील आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी, ऑड. असिम सरोदे, नितीन अंधळे, राहुल डंबाळे आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
दिपके म्हणाले, पेपरफुटीच्या घटनांवर बोलताना “पेपर फुटले, मात्र कोणीही राजीनामा द्यायला तयार नाही. देशातील एक कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे की एका मंत्र्याचे पद?” असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच परीक्षा आणि भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला.
सोनम वांगचुक म्हणाले, पुण्याचे पर्यावरण संवर्धनातील सहभागाचे कौतुक करताना त्यांनी शहरातील नदी संवर्धन, वृक्ष संरक्षण आणि पर्यावरणाशी संबंधित विविध जनआंदोलनांचा उल्लेख केला. पुणे आणि महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये सामाजिक प्रश्नांबाबत असलेली जागरूकता आशादायक आहे. शिक्षण व्यवस्थेतील आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी सत्याच्या मार्गाने संघर्ष करण्याची गरज आहे.
‘पंचसूत्री’ दिपक च्या मागण्या
आंदोलनकर्त्यांनी जाहीर केलेल्या ‘पंचसूत्री’ मागण्यांमध्ये पेपरफुटी झाल्यास विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची भरपाई, परीक्षा पुढे ढकलल्यास नुकसानभरपाई, निकाल उशिरा लागल्यास प्रतिमहिना आर्थिक मदत, भरती प्रक्रियेदरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था, ७२ तासांच्या आत पर्यायी परीक्षेची तारीख जाहीर करणे, उत्तरपत्रिका प्रत्यक्ष तपासणी, वयोमर्यादेत सवलत आणि परीक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट आदी मागण्यांचा समावेश अभिजीत दिपके यांनी केला.
संविधानाच्या बाजूने उभे राहणारे लोक अराजक कसे
मुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्त्यांना ‘अराजक तत्त्वे’ संबोधल्याच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया देण्यात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणारे आणि संविधानाच्या बाजूने उभे राहणारे लोक अराजकवादी कसे असू शकतात?” असा प्रश्न दिपके यांनी उपस्थित केला.
विद्यापीठ आंदोलनमय
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टी (CJP)च्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके यांनी केले. विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले. विद्यापीठ प्रशासनाने काही अटी व शर्तींसह आंदोलनास परवानगी दिली होती. आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी “नरेंद्र मोदी उत्तर द्या”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली होती.






