संग्रहित फोटो
५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार असून, पुणे जिल्हा त्यात समाविष्ट आहे. काही जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी आघाडी केल्याने, मतदारांमध्ये गोंधळ होऊ नये आणि पारंपरिक मतपेढी टिकवून ठेवता यावी, या उद्देशाने ही तडजोड करण्यात येत असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
एनसीपी (एसपी) मधील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, “ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची पकड पूर्वापार मजबूत आहे, तेथे घड्याळ हे चिन्ह घराघरात ओळखीचे आहे. दोन वेगवेगळी चिन्हे ईव्हीएमवर दिसल्यास मतदार संभ्रमात पडू शकतात. त्यामुळे आघाडीतील काही जागांवर घड्याळ चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय दोन्ही गटांच्या नेतृत्वाने घेतला आहे.”
दरम्यान, मे २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये एनसीपी (ळर पवार पक्ष) ने ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत आघाडी केली आणि आता हीच एकत्रित भूमिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही दिसून येत आहे.
मतदारांमधील संभ्रम दूर होणार
राजकीय विश्लेषकांच्या मते, दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढल्यास पक्ष नाव व चिन्हाचा वाद दुय्यम ठरू शकतो. मात्र हाच मुद्दा शिवसेनाच्या दोन्ही गटांसाठी अद्याप महत्त्वाचा राहणार आहे, कारण तेथे समेटाची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. महानगरपालिका निवडणुकांदरम्यान ईव्हीएमवर वेगवेगळी चिन्हे दिसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा अनुभवही यापूर्वी आला आहे. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच जिल्हा परिषद निवडणुकांत ‘घड्याळ’ या ओळखीच्या चिन्हाचा वापर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे मत आहे.






