स्थायी समिती अध्यक्षपद न दिल्याने अमोल बालवडकर यांनी पक्ष सोडला भाजपने दावा केला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Politics : पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ०९ हे केंद्रस्थानी आले असताना, अमोल बालवडकर यांच्या पक्षत्यागामागील खरी कारणे उघड करणारी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विकासाचे मुद्दे पुढे करत केलेले आरोप हे केवळ मुखवटा असून, पदांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्यानेच हा पक्षत्याग झाला, असा गंभीर आणि थेट आरोप भाजपाने केला.
महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच अमोल बालवडकर यांनी पक्ष सोडला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी केलेल्या बिनबुडाच्या, तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत. असे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ०९ मधील अधिकृत उमेदवार आणि नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक ०९ चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर व गणेश कळमकर, तसेच भाजपाचे पदाधिकारी प्रकाश बालवडकर आणि राहुल कोकाटे या पदाधिकाऱ्यांनी अमोल बालवडकर यांनी केलेल्या आरोपांचा सविस्तर व तथ्यात्मक खंडन केले.
हे देखील वाचा : “माझी लढाई मुस्लिमांशी नाही…; बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अमोल बालवडकर यांनी जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे आरोप पूर्णतः खोटे व बिनबुडाचे आहेत. “महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला,” असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत अमोल बालवडकर कोणत्याही पक्षकार्यक्रमात सहभागी नव्हते व पूर्णतः राजकीयदृष्ट्या अनुपस्थित होते, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. “आज विकासाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी स्वतः आजवर कोणते प्रकल्प राबवले, हे जनतेसमोर मांडावे तसेच भविष्यातील नियोजनही स्पष्ट करावे,” असे आवाहन भाजपाने केले.
हे देखील वाचा : कोथरुड-बाणेरमध्ये राजकीय रणकंदन! “अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरेंचा नॅरेटिव्ह खोटा”; लहू बालवडकर-गणेश कळमकर यांचा पलटवार
“पक्षात अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही त्यांनी पक्ष सोडलेला नाही. कारण भारतीय जनता पार्टी हा पदांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे स्पष्ट मत भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केले. विधानसभेपासूनच अमोल बालवडकर यांची पक्ष सोडण्याची तयारी होती आणि पक्षावर दबाव टाकण्याचा हुकुमशाही पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. “त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रचाराचा नारळ फोडून, विकासाच्या कामातून उत्तर देत आहोत,” असे भाजपाच्या उमेदवारांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ०९ मधील मतदारांनी विकासालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.






