APJ Abdul Kalam : भारतरत्न कलामांचा अनोखा खजिना पुण्यात; 'या' ठिकाणी आहे ५०० दुर्मीळ फोटोंचा संग्रह (फोटो सौजन्य: सोनाजी गाढवे)
हे देखील वाचा : Pune Gang War: पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या
खडकी शिक्षण संस्थेत २००२ पासून श्रीमती शकुंतला हेमराज मुथा चित्रकला महाविद्यालय कार्यरत आहे. या महाविद्यालयानं आजवर अनेक नामांकित चित्रकार घडवले. दोन वर्षांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या पाहण्यात एके ठिकाणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची दुर्मीळ छायाचित्रे आली. ती आपल्या संस्थेत असावीत, असे त्यांना वाटल्याने त्यांनी कैलास भिंगारे यांच्यामार्फत ५०० हून अधिक छायाचित्रांचा अनमोल संग्रह मिळवला. त्यानंतर संस्थेने ही छायाचित्रे अतिशय आकर्षक स्वरूपात जपण्याचे काम केले आहे.
सर्वसामान्य चाहत्यांना कलामांच्या आठवणी जागवता आल्या पाहिजेत, यासाठी त्यांचे प्रदर्शन भरविण्यावर संस्थेचे सचिव आनंद छाजेड, सहसचिव व प्राचार्य डॉ. संजय चाकणे, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी भर दिला. त्यानुसार चित्रकला महाविद्यालयाचे मुख्यध्यापक दिनेश लोखंडे व त्यांचे सहकारी संस्थाचालकांच्या मदतीने वेळोवेळी चाहते व विद्यार्थी-विद्यार्थ्यांसाठी त्याची प्रदर्शने भरवतात.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुर्मीळ छायाचित्रांत त्यांच्या विविध मान्यवरांसोबतच्या भेटींची छायाचित्रे, देशासाठी राबविलेल्या विविध मोहिमांच्या काळातील छायाचित्रे, विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधतानाच्या कँडिड आठवणी आणि त्यांच्यासोबत देशासाठी योगदान दिलेल्या विविध शास्रज्ञांसोबतच्या मोहिमाही या छायाचित्रांत कैद आहेत. ही छायाचित्रे पाहताना कलामांचे चाहते व विद्यार्थी-विद्यार्थिनी हरखून जातात.
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी म्हटले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्या देशाचं भूषण होते. त्यांची दुर्मीळ छायाचित्रे लोकांसमोर आली पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे. त्यासाठीच त्यांचे प्रदर्शन भरवले गेले पाहिजे, सर्वसामान्य चाहत्यांना कलामांच्या आठवणी जागवता आल्या पाहिजेत.
हे देखील वाचा : मराठी चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान; निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर






