पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या
Andekar Gang War : गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेले पुण्यातील गँगवॉर पुन्हा उफाळून आले आहे. बालाजीनगर बस स्टँड परिसरात आंदेकर टोळीकडून आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळी आणि प्रतिस्पर्धी गटांतील वैमनस्य पुन्हा एकदा उफाळून आले असून, बालाजीनगर परिसरात झालेल्या थरारक गोळीबारात अक्षय म्हस्के याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुण्यातील गँगवॉर पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी आयुष कोंमकर आणि गणेश काळे यांच्या हत्येनंतरही शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्षाची चर्चा रंगली होती.
मंगळवारी रात्री उशिरा बालाजीनगर बस स्टँड परिसरात ही घटना घडली. अक्षय म्हस्के हा कामानिमित्त घराबाहेर पडला असताना १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्याला गाठल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी त्याच्यावर थेट गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर बालाजीनगर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकाबंदी केली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मृत अक्षय म्हस्के याचा भाऊ वनराज आंदेकर खूनप्रकरणातील आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावरही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हा हल्ला आंदेकर-कोंमकर गँगवॉरशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिकांमध्येही आंदेकर टोळीतील सदस्यांनीच हा ‘रिप्लाय अटॅक’ केल्याची चर्चा सुरू आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर संबंधित आरोपींच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. आंदेकर टोळीतील प्रमुख गुंड सध्या तुरुंगात असले तरी त्यांच्या बाहेर असलेल्या साथीदारांकडून सूडाची मालिका सुरू असल्याचा संशय आहे. यापूर्वीही आरोपींच्या कुटुंबीयांवर हल्ले आणि खुनाचे प्रयत्न झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
दरम्यान, या घटनेमुळे पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात वाढत्या टोळीवादामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.






