केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुरंदर एअरपोर्टवर भाष्य (फोटो- ट्विटर )
पुणे: केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मुरलीधर मोहोळ यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील विमानतळ, धावपट्टीचे विस्तारीकरण, उडान योजना याबद्दल माहिती दिली. जवळपास दीड करोड प्रवाशांनी उडान योजनेच्या माध्यमातून मागच्या अडीच वर्षात प्रवास केला, असल्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ बोलताना म्हणाले, “उडान योजनेमुळे देशामधला विमान प्रवास सामान्य नागरिकांच्या आवाक्यामध्ये आला आहे. देशामध्ये कोलकाता,चेन्नई अहमदाबादनंतर आज पुण्यामध्ये उडान यात्री कॅफेचा शुभारंभ झाला आहे. आता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा दरामध्ये आता खाद्यपदार्थ या ठिकाणी मिळणार आहेत. मागच्या दहा वर्षांमध्ये देशातील विमान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे.”
“देशात या आधी 74 विमानतळ होते आता 160 झाले आहेत. 2047 पर्यन्त देशात 4000 एअरपोर्ट असतील. पुण्यात नवीन टर्मिनल झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरंदर विमानतळबाबत बोलायच झाले तर कुठेही विमानतळ करायचं असेल, तर जागाराज्य सरकार देत असते. एमआयडीसीच्या माध्यमातून ही जागा संपादित केली जाते, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ” पुरंदरचे विमानतळ हे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय केला जाणार नाही. पुणे शहर आणि अन्य गोष्टींवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले, “* पुण्याच्या विमानतळाचा विचार करताना पुढच्या पन्नास वर्षाचा विचार आम्ही करत आहोत. त्यामुळे २०० एकर पेक्षा जास्त जागा ताब्यात घेण्याचा आमचं नियोजन आहे. पुढच्या काळामध्ये अधिकची सेवा पुणेकरांना कशी देता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत.”
पुण्यात आम्ही मेट्रोचे विस्तारीकरण करत आहोत. त्या दृष्टीने ती अधिक वाढवता येईल यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गासाठी देखील महामेट्रोचे अधिकारी यांच्याशी बैठक झाली आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खास सोय
हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ तेही स्वस्तात उपलब्ध व्हावेत. या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ( दि २८) ‘उडान यात्री कॅफे’ या उपहारगृहाचा प्रारंभ करण्यात आला. नागरिक उड्डयन आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विमानतळ संचालक संतोष ढोके व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खास सोय! फक्त 10 रुपयात चहा अन्…
‘उड़े देश का आम नागरिक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वात ‘उडान यात्री कॅफे’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली आहे. या कॅफेच्या माध्यमातून प्रवाशांना १० रुपयात पाणी आणि चहा, २० रुपयांत कॉफी, २० रुपयांत समोसा आणि २० रुपयांत मिठाई उपलब्ध होणार आहे. आजवर कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई या विमानतळांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आता चौथे कॅफे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत झाले आहे.