संग्रहित फोटो
पुणे : पीएमपीएमएल ही ठेकेदाराच्या फायद्यासाठी चालविली जाते का ? असा उपराेधिक प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कारभारावर जाेरदार टिका केली. महापालिकेच्या सभागृहात पीएमपीएमएलला आर्थिक अनुदान देण्यासंदर्भातील विशेष सभेत नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. बसस्थानकांची दुरवस्था, वाढती आर्थिक तूट, भाडेतत्त्वावरील भूखंडांची माहिती, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पेन्शनचा प्रस्ताव, अनुकंपा तत्वावरील रखडलेली भरती, पदाेन्नती गैरव्यवहार, किरकाेळ किंमतीत जुन्या बॅटरीची विक्री, वाहनांची देखभाल दुरुस्ती अशा विविध मुद्यांकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. केवळ विराेधी पक्षाचेच नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या पक्षातील सदस्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले.
माजी महापाैर प्रशांत जगताप, हाजी गफुर पठाण, अश्वीनी भंडारे, प्रसनजीत वैरागे, अश्विनी लांडगे, राकेश कामठे, सुरेंद्र पठारे, मारुती तुपे, दिपाली ढाेक, मृणाल कांबळे, विशाल भेलके, स्वप्नील दुधाणे, सायली वांजळे, सुमय्या नदाफ, सुरज लाेखंडे, सुनील शिंदे आदी सदस्यांनी पीएमपीएमएलच्या प्रशासनाला धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
जगताप, शिंदे यांच्यासह अनेक सदस्यांनी पीएमपीएमएल ही केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी चालविली जाते का ? असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेच्या तुलनेत ठेकेदारांच्या बसेस संचलनात अधिक असतात. भाडेतत्वावरील बसेसचे संचलनातील प्रमाण २५ टक्के इतके अपेक्षित असताना ते प्रमाण ५० टक्क्यांच्या पुढे गेले आहे, असे अनेक मुद्दे नगरसेवकांनी उपस्थित केले.
काेण काय म्हणाले ?
कंपनीचे विभाजन करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी कधी करणार ? – विशाल भेलके
बसथांबा उभारणी आणि नांदेड सिटीसाठी बससेवा सुरु करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष – अनिता इंगळे
भाऊसाहेब शिराेळे बसस्थानकाची दुरावस्था झाली, गाळे बंद पडल्याने उत्पन्नावर परीणाम – अपूर्व खाडे
भाडेतत्वावरील भुखंडाविषयी पारदर्शीपणे माहीती दिली जात नाही – अश्विनी लांडगे
ठेकेदार आणि प्रशासकी अधिकाऱ्यांचे संगनमत आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहीलेत – सुनील शिंदे
नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांच्या मागण्या
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कारभारावरून भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक मुद्दे उपस्थित केले. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर व्हावी, यासाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बससाठी वन नेशन, वन कार्ड’ च्या धर्तीवर एकच Integrated Mobility Card सुरू करावे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि डिजिटल पेमेंटला चालना मिळेल, अशी मागणी नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी केली. यासोबतच न.ता.वाडी डेपो येथील १ कोटी रुपयांचा सोलर प्रकल्प बंद का आहे, याच्या देखभालीअभावी होणाऱ्या नुकसानीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही साळेगावकर यांनी केली.






