पुण्यात होतोय डुकरांचा मृत्यू (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
पुणे: जीबीएस रुग्णांची वाढणारी संख्येमुळे चिंता निर्माण झाली असतानाच, डुकरांचा हाेणारा मृत्यू हा महापािलकेसमाेर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. कोथरूड येथील भारतीनगर ते भिमाले टॉवर दरम्यानच्या नाल्यात गेल्या पाच दिवसांपासून डुकरांचा मृत्यू दररोज होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून येथे सातत्याने मृत डुकरे आढळून येत आहेत. आतापर्यंत 25 हून अधिक मृत डुकरे सापडली आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, संभाव्य आजार व संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या डुकरांच्या मृत्यूमागचे खरे रहस्य काय आहे? विष की काहीतरी? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कोथरूड परिसरातील भारतीनगर ते भिमाले टॉवर दरम्यानच्या नाल्यात दररोज ४ ते ५ डुकरे मृतावस्थेत आढळून येत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून मृत डुकरे सापडत आहेत. बुधवारी तेथे एकूण 10 मृत डुकरे आढळून आली. गुरुवारी मृत डुकरांची संख्या 12 झाली. या नाल्यात आतापर्यंत 25 हून अधिक मृत डुकरे सापडली आहेत. याबाबत पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे मुख्य सचिव दुष्यंत मोहोळ यांनी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला निवेदन देऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. मोहोळ येथे गुरुवारी महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांना दिलेल्या निवेदनात मृत डुकरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.
परिसरात दुर्गंधी आणि रोगराई टाळण्यासाठी मृत डुकरांची त्वरित विल्हेवाट लावावी, असेही त्यांनी सांगितले. डुकरांचा मृत्यू विषामुळे झाला की काही नवीन संसर्गजन्य रोग पसरत आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी परिसरात तातडीने निर्जंतुकीकरण व स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. अनधिकृत डुक्कर पालन करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. परिसरात कोणताही संसर्गजन्य रोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे.
हेही वाचा: मोठी बातमी ! GBS च्या संसर्गाचे खरं कारण आलं समोर; NIV च्या अहवालातून ‘ही’ माहिती स्पष्ट
पुणे महापालिकेचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे म्हणाल्या की, मृत डुकरांच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 2 मृत डुकरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जागेची पाहणीही केली आहे. या डुकरांचे यकृत खराब झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. येथे दोन व्यावसायिकांकडून डुकरांचे अवैध पालन केले जाते. या ठिकाणाहून 20 डुकरे पकडण्यात आली आहेत. तसेच डुकरांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नाल्याच्या पाण्यात काही केमिकल होते का, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.