सौजन्य - नवराष्ट्र टीम
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री कत्र कण्हेरी (ता. बारामती) येथे हनुमान मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पृथ्वीराज जाचक, पुरुषोत्तम जगताप, विश्वासराव देवकाते, राजवर्धन शिंदे, सचिन सातव,सतीश काकडे, संभाजी होळकर, किरण गुजर, धनवान वदक, अविनाश बांदल, संदीप बांदल, शिवाजी काळे, अविनाश गोफणे,दयानंद लोंढे, आदींसह इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नीरा नदीतून वाहून जाणारे पाणी त्याच काळात या योजनेच्या माध्यमातून उचलली जाणार असून, त्याचा फायदा जिरायती भागातील शेतीला होणार आहे, या माध्यमातून बारामती तालुक्याचे परिवर्तन करायचे असून हे परिवर्तन ऐतिहासिक आहे. बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन मापदंड करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. तुम्ही सर्वांनी साथ दिल्यामुळे, हे शक्य झाले. हे मी कधीही विसरणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये तोडीस तोड उमेदवार असतानाही सर्वांना उमेदवारी देणे शक्य नव्हते, मात्र सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे, असं पवार यांनी सांगितले.
प्रत्येक समाज घटकाला आपण विविध ठिकाणी संधी देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. जातीपतीचा आपण कधीही विचार केला नाही. निरा वाघच जिल्हा परिषद गटांमध्ये अभिजीत देवकाते यांच्या पत्नीकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने संविधानानुसार त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र याबाबत कोणीही गैरसमज निर्माण करू नये. बारामती शहरात काही ठिकाणी सर्वसाधारण साठी जागा असताना त्या ठिकाणी अनुसूचित जातीतील अभिजीत चव्हाण व बिरजू मांढरे यांना संधी दिली आहे. बारामती मार्केट कमिटीच्या उपसभापतीपदी सकट यांना संधी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील बनसोडे यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. अनेक अनुसूचित जातीतील न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती तालुक्यातून चांगले उमेदवार आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, लाडक्या बहिणींचे देखील सहकार्य महत्त्वाचे आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
या प्रचार सभेत गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. विविध निवडणुकांमध्ये प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे अनेक वेळा तोडीस तोड असलेले उमेदवार असूनही त्यांना उमेदवारी देता येत नाही. मात्र उमेदवारी न मिळाल्याने काहीजण नाराज होऊन पक्षाच्या अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. मात्र त्यांना आपण विविध ठिकाणी महत्त्वाची संधी दिलेली असते, याचा उल्लेख करत संबंधित दोन पदाधिकाऱ्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटावे, अशी सूचना दिली.






