महिलेच्या विनयभंग प्रकरणी ब्लॅकमेल करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल
बारामती / प्रतिनिधी : बारामती शहरातील एका नगरसेवकाने एका असहाय्य विधवा महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी या नगरसेवकाविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने, ती विधवा आणि असहाय्य असल्याचा गैरफायदा आरोपी किशोर मासाळ याने घेतला. ओळख असल्याचा फायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथे त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला.
आरोपीने पीडित महिलेला धमकावत, “तू बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन,” अशी धक्कादायक धमकी दिली. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विविध मागण्यांसाठी RTO कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; आधी 2 जूनला निदर्शने करणार अन् नंतर…
पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर आप्पासाहेब मासाळ याच्याविरुद्ध गु.र.नं. २५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३२ (८), ७४, ७५, ७८, ११५(२), ३५२, ३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.
६० कोटींच्या उपसूचना घोटाळा प्रकरणी मुख्य वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी






