फोटो - सोशल मीडिया
प्रिती माने : पुण्यामध्ये गणरायाची ऐतिहासिक आणि सुबक अशी अनेक मंदिरं आहे. या शहराला विद्येचे माहेरघर म्हटलं जातं यामुळे विद्येची देवता असलेल्या गणरायाची अनेक मंदिरं पुण्यामध्ये अस्तित्वात आहेत. या मंदिरांची नावं हटके असल्यामुळे त्यांना अशी नाव का पडली आहेत असा प्रश्न उपस्थित होतो. यापैकीच एक म्हणजे गुपचूप गणपती. पुण्यातील कौलारु बांधणीची लाकडी मंदिरं आहेत पण आपल्या नावामुळे वेगळेपणा जपणारा हा गणपती म्हणजे गुपचूप गणपती.
शनिवार पेठेमध्ये हे गुपचूप गणपती मंदिरं आहे. मुठा नदीच्या जवळच आपटे घाटाकडे जाणाऱ्या उजवीकडील रस्त्यावर हे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम लाकडी असून वाड्यामध्ये हे मंदिर आहे. मंदिराला गुपचूप गणपती असे नाव असल्यामुळे सर्वांना असे नाव का आहे याचा प्रश्न पडतो. या गणपतीची स्थापना चिंचवडचे गृहस्थ रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी केली आहे. त्यामुळे गणपतीला नाव देखील गुपचूप गणपती असे पडले. रामचंद्र गुपचूप हे मोरेश्वर शास्त्री आणि रावजी शास्त्री दीक्षित यांचे निष्ठावंत शिष्य होते. गुरुंनी सूचना केल्याप्रमाणे 1892 साली गुपचूप यांनी शनिवार पेठेमध्ये या मंदिराची स्थापना केली.
शनिवार पेठेतील गुपचूप गणपतीला वरद गणपती देखील म्हटले जाते. मंदिरामध्ये मोठ्या लाकडी दरवाज्यातून प्रवेश करता येतो. मंदिराला दिंडी दरवाजा आहे. मंदिरामध्ये गाभारा, सभागृह आणि प्रदक्षिणा मार्ग आहे. सभागृहामध्ये लाकडी असे खांब असून सुंदर असे नक्षीकाम कोरले आहे. 100 वर्षांहून पूर्वीच्या काळातील चित्र या मंदिरामध्ये आहेत. यामध्ये तीन वेगवेगळ्या युगातील गणपतीची चित्रं आहेत. पुण्यामध्ये पानशेत धरण फुटल्याची घटना घडली होती. त्यावेळी शहरात पूर आला होता. तेव्हा मंदिर 28 तास पाण्यामध्ये बुडालेले होते. यावेळी मंदिराचा सगळा भाग वाहून गेला पण गाभारा आणि देवाची मूर्ती त्यासोबतच लाकडी खांब तसेच राहिले. चार वर्षांनंतर मंदिराचा जीर्णौद्धार करण्यात आला.
या गुपचूप वरद गणपतीची गाभाऱ्यामध्ये सुबक अशी मूर्ती आहे. मूर्ती मूळ काळ्या पाषाणामध्ये साकारण्यात आली आहे. मात्र आता मूर्तीवर शेंदूर लेपण करण्यात असून ती पद्मासनामध्ये आहे. वरद विनायकाची मूर्ती डाव्या सोडेंची असून चतुर्भुज अशी तीन फुट उंचीची आहे. वरील दोन्ही हातांत परषू आहेत. खालचा उजवा हात अभयमुद्रेत असून डाव्या हातात मोदक आणि त्यावर सोंड आहे. देवाच्या गाभाऱ्यावर 4 लहान शिखरे आहेत. गणरायाची मूर्ती पाहून अतिशय प्रसन्न वाटते. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये नदी जवळ असणारे गुपचूप गणपती पुण्याच्या ऐतिहासिक आणि लाकडी बांधकामाच्या मंदिरापैकी एक आहे. आजही गुपचूप गणपती मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपून आहे.