हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याचा मुहूर्त चुकणार (फोटो- istockphoto)
पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मार्च २०२५ पर्यंत मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट संबंधित ठेकेदाला पूर्ण करता आले नाही. दरम्यान, हे काम आता डिसेंबर २५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी आयटीयन्स आणि नागरिकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. २३ किलोमीटरच्या या मार्गावरती आणखी काही स्थानकांचे काम बाकी असल्याने यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.
पुणे प्रादेशिक क्षेत्रीय विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए) मार्फत हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गिके असून, ते पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वावर प्रकल्प उभारले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून काम रखडले असून, प्रत्यक्षामध्ये मेट्रोची डेडलाईन पाळण्यामध्ये संबंधित ठेकेदार अपयशी ठरला आहे. हिंजवडी (माण, मेगा पोलीस) ते शिवाजीनगर पुण्यातील तिसरा मोठा मार्ग आहे. संपूर्ण मार्ग हा १८ ते २० मीटर उभ्या केलेल्या खांबावर आहे. त्याचप्रमाणे पुणे- बंगळूरु महामार्ग आणि मुळा नदीच्यावरती उभारण्यात आलेला आहे. या एकूण प्रकल्पासाठी जवळपास ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्च अपक्षेति आहे. प्रत्यक्षामध्ये या कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली. मात्र, मार्च २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. मात्र, या मार्गावरील काही स्थानकांचे काम अपूर्ण असून, शिवाजीनगर (आरबीआय) आणि औंध या दोन ठिकाणी कामे संथ असल्याने याचा मोठा अडथळा या मार्गाला बसला आहे.
काही स्थानकांची इलेक्ट्रिक कामे सुरू
मेट्रो मार्गिकेची लांबी 23.2 किलोमीटर लांबी असून, त्याला 23 स्थानके आहेत. ही मेट्रो एकूण 923 खाब नियोजित असून, एप्रिल 2022 मध्ये गणेशखिंड रस्त्यावर पहिल्या खांबाचे कास्टिंग करण्यात आले आहे. या मार्गावरती ११ स्थानकांची कामे, जिने आणि वेगवेगळ्या परवानग्या या मिळून पुढील सहा महिन्यांमध्ये काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर मेट्रोची ट्रायल आणि काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो खुली करण्यात येईल.
का द्यावी लागली मुदतवाढ
विविध परवानगी आणि वाहतूक नियोजन दृष्टीने काही स्थानकांची कामे वेळेपेक्षा अधिक लांबली असल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की या प्रकल्पावर आली. यामध्ये प्रामुख्याने इंटर कनेक्ट काम असल्याने विद्यापीठ चौकामध्ये कामाची गती कमी आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर असलेल्या एचटी लाईनमुळे देखील या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाले असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाने नमूद केले. या प्रकल्पामध्ये नमूद असलेल्या आणि करारानुसार संबंधित कंपनीने वेळेत काम पूर्ण न केल्याने या कंपनीला दंडाची टांगती तलवार असणार आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर असल्यामुळे कन्सेशन एग्रीमेंट या नुसार जे काही नियम घालून देण्यात आलेले आहे त्यानुसार त्या दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे.
ही आहेत मेट्रो स्थानके
मेगापोलिस सर्कल, एम्बेसी क्चाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज २, विप्रो फेज २, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय आदी.
मेट्रो माण येथील डेपोमध्ये दाखल
या मार्गाची पहिली मेट्रो शहरात दाखल पुणे मेट्रोची या मार्गासाठीची पहिली ट्रेन शहरात दाखल झाली आहे. अलस्टॉम या कंपनीने आपल्या श्रीसिटी (आंध्र प्रदेश) येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. कित्येक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही पहिली मेट्रो माण येथील डेपोमध्ये दाखल झाली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यानुषंगाने या मार्गिकेची कामे सुरू आहेत. काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांसाठी ही मार्गिका खुली होईल. सहा महिन्यांची मुदत देण्याचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे – रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए