लोहोट परिवार राखतेय पर्यावरणाचा समतोल (फोटो- istockphoto)
Follow Us:
Follow Us:
व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती राख पाण्यात सोडून देण्याची परंपरा लोहोट कुटुंबाचा अभिनव उपक्रम पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घेतला पुढाकारसोनाजी गाढवे/पुणे: कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी ती राख पाण्यात सोडून देण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत हीच प्रथा रूढ आहे. मात्र, तिला फाटा देऊन पर्यावरणाचा समतोल राखणारा उपक्रम गंगापूर बुद्रुक (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील लोहोट परिवाराने नुकताच राबवला. त्याचे अनुकरण सर्वांनी करावे, असे आवाहन या परिवाराने केले आहे.
या गावातील विठ्ठलराव लोहोट (मोकाशी) यांच्या पत्नी सरूबाई यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी निधन झाले. अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी परंपरेनुसार फक्त थोडीशी राख घोडनदीच्या पाण्यात सोडण्यात आली व उर्वरित सर्व राख त्यांच्या शेतातील झाडांच्या मुळाशी लावण्यात आली. त्यांचे पुत्र गणपत लोहोट व गंगापूर बुद्रूक ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमासाठी पुढाकार घेतला व यापुढे सर्वांनीच याचे अनुकरण करावे, असा आग्रह त्यांनी धरला आहे.
सरूबाईंचे पुतणे उद्धव लोहोट यांच्या मनात हा विचार अनेक वर्षे घोळत होता. मात्र, इतर कुणाच्या घरातील दु:खद प्रसंगी असा विचार मांडणे त्यांना प्रशस्त वाटले नाही. चुलतीच्या निधनानंतर त्यांनी हा विचार त्यांचे बंधू गणपतराव यांना बोलून दाखवला आणि त्यांच्यासह ग्रामस्थांनीही या विचाराला पाठिंबा देत कृती केली.
… म्हणून आमच्यापासून सुरुवात केली!
‘ग्रामीण भागात इलेक्ट्रिक स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठी कमीत कमी एक झाड सर्व विधी करताना जाळलेच जाते. साहजिकच हवेचे प्रदूषण होतेच. शिवाय त्यानंतर ती राख पाण्यात टाकल्याने पाणी प्रदूषणही होते. ही राख झाडांना टाकल्याने जाळले गेलेले एक झाड दुसरीकडे वाढवल्याचे समाधान आणि जलप्रदूषण रोखण्यातही हातभार लागेल. हे कार्य दुसऱ्या कुणाला सांगून होणार नव्हते. त्यामुळे आम्ही आमच्यापासूनच सुरुवात केली,’ अशा भावना सरूबाईंचे पुतणे उद्धव लोहोट यांनी व्यक्त केल्या.
अंत्यसंस्कारानंतरची राख पाण्यात सोडल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. अनेकांच्या अंत्यसंस्कारप्रसंगानंतर हे दृश्य पाहून यामुळे किती जलप्रदूषण होत असेल, याबाबत चिंता वाटायची. हीच राख झाडांच्या मुळांशी टाकली, तर त्यांनाही खत म्हणून तिचा वापर होईल, जलप्रदूषण रोखण्यासही हातभार लागेल. या विचाराने आमच्या आईच्या निधनानंतर आम्ही ती राख झाडांना टाकण्याचा निर्णय घेतला.
– गणपतराव लोहोट, मुलगा
Web Title: Instead of water pyre ashes are applied to trees lohot family ambegaon navarashtra special story