Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ
Pune Zilla Parishad: पुणे जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या ३०१ कोटी रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकात ३२ कोटी रुपयांची वाढ करून एकूण ३३३ कोटी रुपयांचे पुरवणी अंदाजपत्रक सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्या विकासकामे, पायाभूत सुविधा आणि लोकाभिमुख योजनांचा या पुरवणी अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक १७मार्च २०२६ रोजी तत्कालीन प्रशासक गजानन पाटील यांनी सादर केले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या सूचना आणि विकासकामांच्या मागण्या मांडण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर १८ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सर्व सदस्यांकडून लेखी सूचना मागविल्या होत्या. त्या सूचनांचा विचार करून पुरवणी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यास सोमवारी सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.
मूळ अंदाजपत्रकातील विविध नाविन्यपूर्ण योजनांसह सदस्यांनी सुचविलेल्या नवीन कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सायन्स पार्क, कौशल्य विकास केंद्र, सोलर पार्क, सामुदायिक अक्षय ऊर्जा केंद्र, मॉडेल शाळा, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा डेटा सेंटर, अनुभव केंद्र, पिंक रूम, ‘घे भरारी’, फिरते शॉपी योजना आणि सावित्री कॅफे यांसारख्या उपक्रमांचा यात समावेश आहे.
याशिवाय ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, जिल्हा परिषद शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, विद्यार्थ्यांसाठी इस्रो व नासा यांसारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यांचे आयोजन, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती, खडीकरण, डांबरीकरण तसेच दळणवळण सुविधा सक्षम करण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा, कॉलेजला सुट्टी; प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी, युवक, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच मागास घटकांपर्यंत विकासाच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने पुरवणी अंदाजपत्रकातील निधीचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. त्यांच्या मते, ग्रामीण भागातील विकासाला चालना देणाऱ्या आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कामांना या पुरवणी अंदाजपत्रकात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.






