पीओपीच्या मूर्ती करण्यावर हायकोर्टाची बंदी ( फोटो- istockphoto)
पुणे: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती बनविणे आणि विसर्जित करण्यास बंदीच्या आदेशाचे काटेकाेरपणे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यापार्श्वभुमीवर महापािलकेने नियमावली तयार केली आहे. यावर्षी गणेशाेत्सवात मुर्ती शाडू मातीचीच तयार करावी लागणार आहे. गणेशोत्सवामध्ये घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी लाखो मूर्त्या बाजारात विक्रीसाठी आणलेल्या असतात. मूर्तीकारांकडून पीओपीच्या मूर्ती बनविण्यावरच भर दिला जातो. पण पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत, त्यावर रसायनमिश्रीत रंग दिल्याने पाणी प्रदूषण होते. याकारणामुळे पीओपीच्या मूर्ती बनविणे आणि विसर्जित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पीओपीची मूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या मूर्तीकारांना आता शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्या लागणार आहेत.
केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० मध्ये मूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केले होते. त्यास अनुसरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली जाहीर केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेच्या ३० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत विविध सण-उत्सावादरम्यान सर्व महापालिका, सर्व जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांतील कलम २ नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार
काय आहे नवीन नियमावली?
– मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक जैवविघटक पदार्थांपासून कराव्यात.
– प्लास्टिक, थर्माकोल, पीओपीचा समावेश नसणाऱ्या मूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन
– पीओपी पासून मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यास पूर्णपणे बंदी
– मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात तसेच मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक
– रंग जैव विघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक असावेत
– विषारी व अविघटनशील रासायनिक रंग, ऑईल पेंट्स, कृत्रिम रंग वापर करू नये
– पूजेसाठी फुले, वस्त्र, पूजा साहित्य पर्यावरणपुरक असावे
– काच, धातूपासून बनविलेल्या ताट-वाट्यांचा वापर करावा
– अन्नदानासाठी एकवेळ वापराचे प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक साहित्य वापरू नये
– मूर्तींचे दागिने बनविताना वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादीचा वापर करावा
– न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणाऱ्या मूर्तीकारांकडून, विक्रेत्यांकडून नागरिकांनी मूर्ती खरेदी करावी.