वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी ncpचे सुनील गणेश ढोरे यांची बिनविरोध निवड झाली (फोटो - सोशल मीडिया)
Vadgaon Maval Deputy Mayor : वडगाव मावळ : सतीश गाडे : वडगाव नगरपंचायतीच्या (Maval News) उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Politics) सुनील गणेश ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ राजाराम ढोरे व भारतीय जनता पक्षाचे संदीप भास्कर म्हाळसकर यांचीही बिनविरोध निवड झाली. ही निवड प्रक्रिया नगराध्यक्ष अबोली मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
आज (दि, 12 जानेवारी) सकाळी ११ वाजता उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले होते. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील ढोरे तर भाजपकडून अर्चना म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीनंतर अर्ज माघारीच्या मुदतीत भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने सुनील ढोरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
हे देखील वाचा : निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु
स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरीनाथ ढोरे व भाजपकडून संदीप म्हाळसकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. दुपारी १.१५ वाजता नगराध्यक्ष अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनील ढोरे तसेच स्वीकृत नगरसेवकांचा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, विकासकामांना प्राधान्य देणे व पारदर्शक कारभार राबवणे, असा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागा, भाजप महायुतीला ६ जागा, तर २ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली ढोरे यांची निवड झालेली आहे.
हे देखील वाचा : “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
यावेळी भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे गणेशअप्पा ढोरे सुधाकर शेळके, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, अशोक बाफना गटनेते अजय बाळासाहेब म्हाळसकर, पक्षनेत्या माया चव्हाण, तसेच नगरसेवक अनंता कुडे, विशाल वहिले, गणेश म्हाळसकर, पूनम भोसले, सुनीता ढोरे, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर, रोहित घडवले, अजय भवार आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था तसेच मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात येईल. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकासात्मक निर्णय घेतले जातील. स्वीकृत नगरसेवकांनीही पारदर्शक प्रशासन व लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात वडगाव शहराच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधक यांच्यात समन्वय ठेवून काम केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राजकीयदृष्ट्या पाहता वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने उपनगराध्यक्षपदावरही राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकपदांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.






