पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर (संग्रहित फोटो)
नीरा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नीरा येथे होणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन करण्यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दि. ७) नीरा पोलीस दूरक्षेत्रात समन्वय बैठक घेण्यात आली. वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर आराखड्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
श्री दत्त घाटावरील ऐतिहासिक शाही नीरा स्नान सोहळा आणि पालखीचा नदीकाठावरील दुपारचा विसावा यामुळे दरवर्षी हजारो वारकरी व भाविक नीरा येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळणे, रस्त्याच्या दुतर्फा होणारे अनधिकृत पार्किंग रोखणे, शासकीय वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करणे तसेच भाविकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत भर देण्यात आला. स्वयंसेवकांच्या माध्यमातून गर्दी नियंत्रण आणि वाहतूक वळविण्याचाही आराखडा निश्चित करण्यात आला.
आपत्कालीन सेवांना अखंड मार्ग उपलब्ध राहील, विसावा स्थळ व प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल, सीसीटीव्हीद्वारे सतत देखरेख केली जाईल. तसेच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पालखी सोहळा शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी नागरिक, व्यापारी, स्वयंसेवक व सामाजिक संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी सभापती दत्ता चव्हाण, महेश जेधे, ॲड. पृथ्वीराज चव्हाण, पोलीस पाटील राहुल शिंदे, रूपाली सोनवणे, दीपक जाधव, दिनेश खोमणे, मंगेश ढमाळ, अजय सोनवणे, अश्फाक शेख, सुरेंद्र जेधे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणांचाच वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर पोलिस हवालदार संतोष मदने यांनी आभार मानले.






