पुणे, मुंबई, पालघरसह अनेक जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; विविध ठिकाणी पावसाचा हाहा:कार(संग्रहित फोटो)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. सध्या देशभरात पावसाचा हाहा:कार पाहिला मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. असे असताना आता पुणे जिल्ह्याच्या काही भागाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यातील म्हणजेच सह्याद्री घाट परिसरातील शाळा उद्याही बंद राहणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील इतर तालुके आणि पुणे शहरातील शाळा मात्र सुरूच राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका परिसरातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही मंगळवारी बंद राहणार आहेत. पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे लोणावळ्याजवळील ‘मिसिंग लिंक’सह अनेक घाटांमध्ये दरडी कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मावळमधील पाटण येथे घरावर दरड कोसळून तिघाजणांच्या कुटुंबाचा अंत झाल; तर प्राधिकरण परिसरातील भेल चौकात संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काम करणाऱ्या मजुरांपैकी एका कामगाराचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
घाटांमध्ये दरडी कोसळल्याने रस्ते बंद
गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः कहर केला असून, चार जणांचा बळी गेला आहे. घाटांमध्ये दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला, तर रेल्वे आणि बससेवा ठप्प पडल्याने नागरिकांचे हाल झाले. धरणांतून अद्याप पाणी सोडलेले नसले तरी, पावसाच्या पाण्यामुळेच सगळ्या नद्या दुथडीभरून वाहत असून, नागिरकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दिवे घाटामध्ये पुन्हा वाहतूक कोंडी
पावसामुळे दिवे घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, दगड-माती हटवून रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. पौड-माणगाव मार्ग आणि भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात दरडी कोसळल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. मुळशी तालुक्यातील शिरगाव-मोहरी मार्ग, भोर तालुक्यातील महाड-पंढरपूर मार्गावरील शिरगाव वाळवंट परिसर तसेच मावळ तालुक्यातील पांगोळी आणि खंडाळा-लोणावळा परिसरातही दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.






