शिवनेरीतून प्रवास करताना प्रवाशांची अडचण (फोटो- msrtc )
पुणे: राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ताफ्यात असलेल्या ‘शिवनेरी’ इलेक्ट्रिक बस सेवेमध्ये तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार्जिंग अपुरी असल्याने अनेक वेळा प्रवास अर्धवट थांबवावा लागतो, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पुण्यातील वाहतूक मार्गांवर सध्या सुमारे ३० ई-शिवनेरी बस कार्यरत आहेत. ही सेवा सुरुवातीला पर्यावरणपूरक व आधुनिक अशी ओळख निर्माण करत असली तरी, सध्या बस चार्जिंगची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. प्रवास सुरू असताना चार्जिंग संपल्यास चालकांना बस थांबवावी लागते. परिणामी, प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जातो, तसेच त्यांच्या प्रवासाच्या योजनाही बिघडतात. यावर एमएसआरटीसीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार बस चार्जिंगसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव व देखभालीतील हलगर्जीपणा यामुळे ही स्थिती उद्भवते आहे.
याबाबत बोलतांना एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे म्हणाले, पुणे विभागातील इ बस पूर्ण क्षमतेने चार्ज झाल्याशिवाय आम्ही डेपोच्या बाहेर काढत नाही. कोणती समस्या आहे, याचा तपास केला जाईल. त्यानंतरच अधिक बोलणे योग्य ठरेल.
प्रमुख मुद्दे:
– पुण्यात सध्या ३० ई-शिवनेरी बस कार्यरत
– अनेक वेळा प्रवास अर्धवट थांबतो
– चार्जिंग सुविधा अपुऱ्या
– प्रशासनाकडून ठोस उपायांची प्रतीक्षा
मी ठाण्याहून पुण्याला येत असताना शिवनेरी बस पकडली. पण वाटेत बस बंद पडल्याने आम्हाला इतर वाहनांचा वापर करून पुढील प्रवास पूर्ण करावा लागला. ही फार मोठी गैरसोय आहे.
आशिष पवार , प्रवासी.
लालपरीच्या अडचणीत वाढ! परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बिघडत्या आर्थिक स्थिती लक्षात घेत राज्य सरकार आता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोमवारी (२३ जून) एक सविस्तर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार आहेत, ज्यामध्ये महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती, तोटा, महसूल, खर्च, थकीत कर्जे आणि प्रलंबित देयके यांची संपूर्ण माहिती देण्यात आली. या श्वेतपत्रिकातून केवळ परिस्थिती सार्वजनिक होणार नाही तर महामंडळाला संकटातून बाहेर काढण्यासाठी संभाव्य उपाय देखील सुचवले जाणार आहेत.
एसटी महामंडळाला सध्या दररोज १ ते २ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आतापर्यंत तर एकूण तोटा १०,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. मार्च २०२४ मध्ये भाड्यात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. गेल्या ९ वर्षांत एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२३ वगळता कोणत्याही महिन्यात नफा कमावलेला नाही. त्या एका महिन्यात ₹ १६.०८ कोटींचा नफा नोंदवला गेला. महामंडळावर सध्या कर्मचाऱ्यांचे ₹३,५०० कोटी आणि पायाभूत सुविधा आणि पुरवठा देणी म्हणून ₹७,००० कोटी देणे आहे.