सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : महाराष्ट्र दिनी दिमाखात लोकांसाठी खुला झालेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सध्या सेल्फी आणि रिल्स बनवणाऱ्यांच्या विळख्यात सापडला आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा आणि देशातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून फोटो काढणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, याच ठिकाणी पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी धावत्या प्रवासात वाहन थांबवून फोटो काढल्याने, “नियम फक्त सामान्यांसाठीच का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नेमकी घटना काय?
सोमवारी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबईला जात होते. यावेळी मिसिंग लिंकवरून जात असताना पुलाच्या भव्यतेमुळे त्यांनी वाहन थांबवून छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकल्पाचे कौतुक केले. “विकास केवळ दिसत नाही, तो प्रत्येक प्रवासात जाणवतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, ज्या ठिकाणी सामान्य वाहनचालकांना थांबण्यास बंदी आहे, तिथे लोकप्रतिनिधीनेच नियम मोडल्याने वादाला तोंड फुटले आहे.
नियम धाब्यावर: २० चालकांवर दंड
प्रकल्प सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. महामार्गावर ताशी १०० ते १२० किमी वेगाने वाहने धावत असल्याने, अशा हाय-स्पीड कॉरिडॉरमध्ये वाहन थांबवणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते. तरीही सलग चौथ्या दिवशी येथे सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी कायम होती.
हे सुद्धा वाचा : सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य; बारामती पोटनिवडणुकीत इतिहास रचला
नागरिकांचा रोष आणि दुहेरी निकष
महापौरांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. पोलिसांनी यापूर्वीच येथे थांबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांवर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.






