सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ शहराला मिळावा, या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन शहराशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि विकास प्रकल्पांचा पाठपुरावा केला. रेड झोनमुक्ती, राष्ट्रीय महामार्ग, क्रीडा विकास आणि महिला औद्योगिक क्लस्टर यांसह विविध विषयांवर त्यांनी केंद्र सरकारकडे सविस्तर भूमिका मांडली.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या बैठकीत शहरातील रेड झोनचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला. संरक्षण विभागाच्या निर्बंधांमुळे बांधकाम परवानग्या, पुनर्विकास, मालमत्ता व्यवहार आणि बँक कर्जांमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, संरक्षण प्राधिकरण आणि महापालिका यांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. तसेच राजनाथ सिंह यांना पिंपरी-चिंचवडला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) आठ पदरीकरणासाठी भूमी संपादन प्रक्रिया पूर्ण करून कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली. भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल कायम ठेवण्याबाबत तसेच मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याची विनंतीही करण्यात आली.
केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याशी झालेल्या चर्चेत पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मेयर्स कप’ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ अभियानांतर्गत शहरासाठी आर्थिक व तांत्रिक सहकार्याची मागणी करण्यात आली.
एमएसएमई मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संदीप पोखरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महिला औद्योगिक क्लस्टर उभारणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, महिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण, निधी आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
दिल्ली दौऱ्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारपर्यंत सातत्याने पोहोचविणार असल्याचे सांगितले. वाढत्या लोकसंख्येला आणि औद्योगिक विस्ताराला पूरक अशा आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा : NEET/CBSE पेपरफुटीवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला राज्यभर कँडलमार्च व सत्याग्रह






