संग्रहित फोटो
मुंबई : देशभरात पेपरफुटीवरून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून, लाखोंच्या संख्येने विद्यार्थी व पालक आंदोलनात सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नावर काँग्रेस पक्षानेही सर्वात आधी लढा देण्यास सुरुवात केलेली आहे. काँग्रेस पक्षाने आता हे आंदोलन गावोगावी पोहचवण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शनिवार दिनांक २५ जुलै २६ रोजी प्रत्येक जिल्ह्यात कँडल मार्च आणि सत्याग्रह आयोजित केला आहे, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे.
NEET/CBSE परिक्षांच्या प्रश्नपत्रिका वारंवार फुटत आहेत. मागील १० वर्षात तब्बल १५२ वेळा पेपर लिक होऊनही मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. या निगरगट्ट सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. आपले हक्क मागणाऱ्या तरुण मुला-मुलींवर जागोजागी अमानुषपणे मारहाण केली जात आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून राज्यभर कँडल मार्च व सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, परीक्षेत झालेल्या अनियमितता आणि व्यवस्थात्मक अपयशांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, त्यावर संसदेत तत्काळ चर्चा करावी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले एफआयआर आणि गुन्हे त्वरित मागे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी युवकांची माफी मागावी, या प्रमुख मागण्या आहेत.
हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी पद्धतीने वागत आहेत. मुलांना ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्यानंतर आता दादरमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यापर्यंत फडणविसांच्या पोलिसांची मजल गेली आहे. तरुण मुलांवर लाठीहल्ला केला जात आहे. विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनासारखी असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणविस यांच्यावर निशाणा साधला.






