सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुण्यात गुन्हेगारी असून, वेगवेगळ्या भागात सतत खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता आज भरदिवसा एक खळबळजनक घटना घडली आहे. घोरपडे पेठ परिसरातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. नूर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासेवाडी परिसरातील कुख्यात परदेशी गँगशी संबंधित गुंडांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर आरोपी तातडीने घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या नूर शेखला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जखमी नूर शेख हा राज्यभरात गाजलेल्या वनराज आंदेकर मर्डर केस मधील महत्त्वाचा आयव्हिटनेस म्हणजेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याची चर्चा आहे. पण पोलिसांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य हल्लेखोर सुजल परदेशी याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
कात्रज चौकात बहिणीची छेड काढल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांसह त्यांच्या टोळीने एका १७ वर्षीय मुलाचा निर्घुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा खून जुन्या वाद-विवादातून देखील झाल्याची शक्यता आहे. या खूनाच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पोलिस गाडीच्या बोनेट वर बसवून आणत असताना खून झालेल्या मुलाच्या आईने अचानक पोलिस गाडी अडवून चप्पलने मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर, चौघांचा शोध सुरू आहे. गणेश रविंद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश याच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार रात्री दहाच्या सुमारास घडला आहे.






