समान पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण (फोटो - सोशल मीडिया )
पुणे: पाण्याची गळती रोखण्यासाठी आणि शहराच्या सर्व भागांना समान पाणीपुरवठा योजना करण्यासाठी महापालिकेने 24 बाय 7 ही योजना राबविली आहे. या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी 2018 मध्ये सुरवात झाली. पाच वर्षांच्या कालावधीत म्हणजे मार्च 2022 पर्यंत या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत होते.
मात्र, मुदत संपूनही काम अपूर्ण असल्याचे सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीवरून समोर आले आहे. या योजनेवर आतापर्यंत दीड हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. या कामाचा स्कोप 25% नी कमी करूनही हे काम मार्च 2026 पर्यंत रेंगाळणार असे मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
मोठा गाजावाजा करून राबविलेली महापालिकेची चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेची मुदत संपून दोन वर्षे उलटूनही या योजनेचे काम अपूर्णच असल्याचे समोर आले आहे. अद्यापही जवळपास 20 टक्के काम शिल्लक असून ते पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षभराचा कालावधी लागणार आहे.
योजनेची सध्या सद्य:स्थिती
– या योजनेतंर्गत बांधण्यात येणार्या एकूण 86 टाक्यांपैकी सहा वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही 60 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत 26 टाक्यांची कामे बाकी आहेत.
– मध्यवर्ती पेठांमधील पाणी मीटर बसविण्याचे काम फक्त 67 टक्के मीटर्स बसले असून पाईप लाईनचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे.
– लोहगाव, धानोरी, कळस या भागातील कामाची सद्यस्थिती बघता 93% काम पूर्ण झाले आहे.
– वारजे भागात 82 टक्के मीटर्स बसले असून पाईप लाईनचे काम 97% पूर्ण झाले आहे.
– कॅन्टोन्मेंट भागात फक्त 51 टक्के मीटर्स बसले असून पाईप लाईनचे काम फक्त 11 टक्के पूर्ण झाले आहे.
– वडगाव भागात 87 टक्के मीटर्स बसले असून 97 टक्के पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे.
ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली
जानेवारी महिन्यातच पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे आकडेवारीतून समाेर आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यातच टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. खासगी टॅंकर व्यावसाियकांवर महापािलकेचे काेणतेही नियंत्रण नाही, परंतु महापालिकेच्या ठेकेदारी पद्धतीवरील टॅंकरवर तरी कर्मचाऱ्यांचा ‘वाॅच’ राहणार का ? याचे उत्तर पुढील काळात मिळेल.
महापालिकेच्या टँकर पॉइंटवरून जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकर पुरविण्यात आले आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात पुरविलेल्या टँकरच्या तुलनेत ही संख्या ७ हजार ११२ने जास्त आहे. ज्या भागात महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा कार्यरत नाही, यंत्रणा असुनही अपुरा पाणी पुरवठा हाेताे अशा भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत. एका ठेकेदाराकडे कमीत कमी आठ टँकर असावेत, असे बंधन टाकण्यात आले आहे.