भाजपने सुरू केल्या उमेदवारांच्या मुलाखती (फोटो- टीम नवराष्ट्र)
भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरवात
अर्जांची संख्या प्रचंड असल्याने उमेदवाराला अवघे चार ते पाच मिनिटेच वेळ
भाजपकडे तब्बल २,५०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल
पुणे: महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरवात केली आहे. पक्षाशी असलेली एकनिष्ठा, प्रभागात केलेली कामे, जनसंपर्क, नागरिकांमधील प्रतिमा आणि मी उमेदवारीसाठी कसा किंवा कशी योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी अनेक इच्छुकांनी थेट पीपीटी प्रेझेंटेशन, कामांच्या फाइल्स आणि कागदपत्रांसह मुलाखतींना हजेरी लावली. मात्र, अर्जांची संख्या प्रचंड असल्याने प्रत्येक उमेदवाराला (Local Body Election) अवघे चार ते पाच मिनिटेच देण्यात आल्याने भाजपच्या या ‘फास्ट ट्रॅक इंटरव्ह्यू’मुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
पुण्यातील ४१ प्रभागांसाठी भाजपकडे तब्बल २,५०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जदारांच्या मुलाखती शनिवारी भाजपच्या शहर कार्यालयात सुरू झाल्या असून रविवारीही त्या सुरू राहणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि श्रीनाथ भिमाले यांनी या मुलाखती घेतल्या. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांनुसार विभागणी करून स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्या. त्यात धीरज घाटे आणि गणेश बीडकर यांनी प्रत्येकी तीन, तर श्रीनाथ भिमाले यांनी दोन विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांची मुलाखत घेतली.
Maharashtra Politics: ‘आपली ताकद किती? MVA म्हणून…’; ठाकरेंच्या बैठकीत नेमके काय घडले?
अनेक इच्छुकांनी मी काय केलं यावर भर देत आपल्या कामांचा पाढा वाचला, तर काहींनी थेट प्रेझेंटेशनद्वारे आकडेवारी, छायाचित्रे आणि विकासकामांचे दाखले मांडले. काही इच्छुकांनी तर जाडजूड फाइल्स, अहवाल आणि कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन मुलाखतीला हजेरी लावली होती. मात्र, इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने मुलाखतीचा कालावधी अत्यंत मर्यादित ठेवण्यात आला. अवघ्या चार ते पाच मिनिटांत आपली बाजू मांडावी लागत असल्याने काही जण प्रश्नांच्या सरबत्तीने गोंधळले, तर काहींनी नेमकेपणाने आणि आत्मविश्वासाने उत्तरे देत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. काही इच्छुक मात्र ‘उमेदवारी मिळणारच’ या आत्मविश्वासात दिसत होते.
Maharashtra Politics: महापालिका निवडणुका MVA एकत्रित लढणार? ‘या’ नेत्याचे कार्यकर्त्यांना निर्देश
भाजपबरोबरच पक्षाबाहेरील काही इच्छुकांनीही अर्ज भरल्याने शनिवारी व रविवारी होणाऱ्या मुलाखतीत पक्षाबाहेरील माजी नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे. आमच्या मुलाखती सर्वांसमोर नको, अशी भूमिका काहींनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक जण भाजपच्या वाटेवर असून, त्यापैकी काहींचा प्रवेश पुढील आठवड्यात वरिष्ठांच्या सूचनेनुसार होईल, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?






