पुणे पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजन ऑगस्टपर्यंत साठा राखीव ठेवण्यात येणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : आकाश ढुमे पाटील : हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागाने अंमलबजावणी सुरू केली असून, यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा जूनऐवजी थेट ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. वाढती लोकसंख्या, तसेच स्थलांतरित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक बनले आहे.
पाटबंधारे विभागाचे अधिकारी फाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाण्याचे वाटप करताना ठराविक प्राधान्यक्रम पाळला जात आहे. यामध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असून, त्यानंतर औद्योगिक वापर, शेतीसाठी पाणी आणि नदीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. यामुळे मर्यादित साठ्याचा योग्य वापर होऊन संभाव्य टंचाई टाळण्याचा प्रयत्न आहे.
हे देखील वाचा : मंगल भवन अमंगल हारी! पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरात Ram Navami चा उत्साह; उत्सवाचे २६५ वे वर्ष
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हवामान बदलामुळे मान्सून अनिश्चित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने सर्व विभागांना पाण्याच्या काटकसरीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांवरील अवलंबित्व लक्षात घेता, पावसाचे प्रमाण घटल्यास धरणसाठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत धरणातील साठा अधिक काळ टिकवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पीक पद्धतीत बदल अपेक्षित
हवामानातील बदलांमुळे या वर्षी पाऊस कमी पडण्याची शकता वर्तवण्यात आली असल्यामुळे धरणात पाण्याची किती उपलब्धता राहील याबाबत शंका वर्तवण्यात आली आहे . त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता असणारी ऊसा सारखी पिके न घेता पीक पद्धतीत बदल करून कमी पाण्यावर येणारी पिके घेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.
स्थलांतरित लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढली
पुणे शहरात नोकरी निमित्ताने किंवा शिक्षण या साठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेरून , राज्याबाहेरुन लोकसंख्या आलेली आहे. धरणाची साठवणूक क्षमता तेवढीच आहे ,परंतु पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झालीं आहे.
हे देखील वाचा : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
काटेकोर नियमांची अंमलबजावणी होणार ?
हवामानातील बदलामुळे अनिश्चित स्वरूपाचा मान्सून असल्यामुळे यंदाच्या वर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरणार का यावर साशंकता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे पाणी वापरा संदर्भात कठोर नियमांची अंमलबजावणी आगामी काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे पाटबंधारे विभागाचे फाळके म्हणाले की, “धरणातील पाणी 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल अशा अनुषंगाने अंमलबजावणी सुरू केली आहे या बाबत कॅबिनेट मंत्र्यांनी सूचना केल्याप्रमाणे काम करत आहोत.” असे देखील ते म्हणाले आहेत.






