मिळकत करात 50 टक्के सवलतीला पुणे महापालिकेची मान्यता
पुणे : महापालिकेच्या हद्दीतील महिलांच्या नावावर असलेल्या पाचशे चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींना मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. परंतु, ही सवलत केवळ चालू आर्थिक वर्षासाठीच देण्यात येईल, अशी अट प्रशासनाने घातली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मिळकत कर माफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे महिलांच्या नावावर असलेल्या पाचशे चौरस फुटापर्यंतच्या मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. तसेच हा प्रस्ताव मुख्य सभेच्या मान्यतेनंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर प्रस्ताव मान्य करताना, प्रशासनाने काही अटी लादल्या आहे. यामध्ये ३१ मार्च २०२५ राजी ज्या मिळकती महिलांच्या नावावर आहेत, त्यांनाच सदर योजनेचा लाभ मिळेल अशी अट घातली गेली आहे. त्याचप्रमाणे ही सवलत योजना २०२६ -२७ या आर्थिक वर्षासाठीच लागू राहील असेही नमूद केले आहे. एप्रिल २०२६ पूर्वीच्या थकबाकीवर ही योजना लागू राहणार नाही, तसेच व्याज, दंड ,शास्ती यावर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. महापालिकेच्या धोरणानुसार सध्या ज्या मिळकतींना ४० टक्के सवलत दिली जाते, त्या मिळकतींना ५० टक्के सवलत दिली जावी अशा अटींचा यात समावेश आहे.
महापालिकेचे उत्पन्न घटणार
महापालिकेच्या हद्दीत महिलांच्या नावावर असलेल्या पाचशे चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींची संख्या ७० हजार ७७३ इतकी आहे. यातून महापालिकेला अंदाजे ४० कोटी ४८ लाख रुपये इतके उत्पन्न मिळते. पन्नास टक्के सवलत दिल्यानंतर अंदाजे २० कोटी रुपये इतके उत्पन्न कमी होणार आहे.
पुणे महापालिकेत 13 ठिकाणी बिनविरोध
दुसरीकडे, पुणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपचे वर्चस्व दिसून आले. १५ प्रभाग समिती अध्यक्षपदांपैकी भाजपकडे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी १ अध्यक्षपद मिळाले आहे. १३ ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहाप्रमाणेच प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महिलांचा आवाज घुमणार आहे.
Ashok Kharat Case : अशोक खरातबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर; सरकारी डॉक्टरला सोबत घेऊन…






