सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप असल्याने मावळ शासकीय कार्यालय बंद आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maval News : वडगाव मावळ : सतिश गाडे : राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारल्यामुळे मावळ तालुक्यातील सह दुय्यम निबंध कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी, या संपाचा मोठा फटका स,र्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
दस्त नोंदणीसह विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. विशेषतः खरेदीखत नोंदणीसाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, कार्यालय बंद असल्याचे समजल्यानंतर ते संपाबाबत चौकशी करून परत जात आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या सूचनेनुसार, “दि. २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप सुरू असून दस्त नोंदणीचे कामकाज बंद राहील,” असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कर्मचारी संघटनांनी नागरिकांना त्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, संपाचा आज तिसरा दिवस असून परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अचानक संप मागे घेतल्यास दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मावळ तहसील कार्यालयातही याच पार्श्वभूमीवर नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
हे देखील वाचा : शिवशाही बसला भीषण आग, बस पूर्ण जळून खाक, 15 प्रवासी थोडक्यात बचावले
संपामुळे केवळ दस्त नोंदणीच नव्हे तर इतर अनेक शासकीय सेवांवरही परिणाम झाला असून नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेषतः जमीन खरेदी-विक्री व्यवहार, कर्जप्रकरणे, तसेच कायदेशीर प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे प्रलंबित राहिल्याने अनेकांचे व्यवहार अडकले आहेत.
दरम्यान, काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संप पुकारण्यात आल्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. “दिवसभराची कामे सोडून कार्यालयात आलो, मात्र काम न झाल्याने परत जावे लागले,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
विधिज्ञ आणि दस्त नोंदणीशी संबंधित काम करणाऱ्या व्यावसायिकांनाही या संपाचा फटका बसत असून त्यांच्या रोजीरोटीवरही परिणाम होत आहे. कामकाज बंद असल्याने अनेक व्यवहार रखडले असून आर्थिक चक्र मंदावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी; बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा
याचबरोबर, काही ठिकाणी कार्यालयाबाहेर नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, स्पष्ट माहितीअभावी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे, अशीही मागणी होत आहे.
संप लवकरात लवकर मागे न घेतल्यास आगामी दिवसांत नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असून, प्रलंबित कामांचा ढिगारा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांनी तातडीने सकारात्मक तोडगा काढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वतीने राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हा संप मिटवावा आणि शासकीय कामकाज सुरळीत सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.






