मुख्य निवडणूक आयुक्तांना 'भारतरत्न' द्या! हिमंता बिस्वा सरमा यांची केंद्राकडे मोठी मागणी
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यास पक्षाच्या उमेदवारांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
भाजप आसाममध्ये 100 तर पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकेल, असा दावा करत त्यांनी पक्षाच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार देण्याची मागणीही त्यांनी केली. देशात SIR (विशेष निवडणूक सुधारणा) लागू करण्यासाठी त्यांच्या योगदानाचे स्मरण राहील, असे सांगत हा उपक्रम आसाममध्येही राबवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत..! अमित शाहांनी पहिल्या टप्प्यानंतरच सांगितला मॅझिकल आकडा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाचा दावा केल्यावर सरमा यांनी त्यावर पलटवार केला. “त्यांचे वक्तव्य पराभवाच्या आधीची झलक दाखवते,” असा टोला त्यांनी लगावला. ममता बॅनर्जी यांच्या भाषणाचा सूर बदलल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप 4 मे रोजी 200 हून अधिक जागा जिंकून राज्यात सत्ता स्थापन करेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. या ऐतिहासिक सहभागाबद्दल त्यांनी दोन्ही राज्यांतील मतदारांचे अभिनंदन केले.
हिमांता बिस्वा सरमा यांच्या या भूमिकेवर माजी मंत्री कपिल सिबल यांनी निशाणा साधला. “पश्चिम बंगालमधील लोकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. या कामासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे.” अशा खोचक शब्दांत त्यांनी खिल्लीही उडवली
पश्चिम बंगालमधील २९४ जागांपैकी १५२ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान झाले, तर तामिळनाडूमधील सर्व २३४ जागांवर मतदान झाले. रात्री १० वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ९२.६६ टक्के आणि तामिळनाडूमध्ये ८५.१४ टक्के मतदानाची नोंद झाली, ज्यामुळे मागील सर्व विक्रम मोडले गेले.
या निवडणुकीचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा वाढलेला सहभाग. दोन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. पश्चिम बंगालमध्ये महिला मतदारांची टक्केवारी ९२.६९% होती, तर पुरुषांची ९०.९२% होती. त्याचप्रमाणे, तामिळनाडूमध्ये महिलांचा सहभाग ८५.७६% होता, जो पुरुषांच्या ८३.५७% पेक्षा जास्त होता. निवडणूक आयोगाने तृतीयपंथी मतदारांच्या लक्षणीय सहभागावरही प्रकाश टाकला. तामिळनाडूमध्ये ६०.४९% मतदान झाले, तर पश्चिम बंगालमध्ये ५६.७९% मतदानाची नोंद झाली.






