सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सध्या घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पुणेकरांची मोठी ‘गॅस’कोंडी झाली असून, बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील नियोजन कोलमडले आहे. मध्यवर्ती पुण्यात परिस्थिती काहीशी नियंत्रणात असली, तरी शहराच्या सीमावर्ती भागांत आणि नवीन गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मात्र नागरिक हवालदिल झाले आहेत.
पुण्यातील उपनगरे आणि नव्याने विकसित होणाऱ्या भागांत गॅस वितरणाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नियमानुसार बुकिंग केल्यानंतर २४ ते ४८ तासांत सिलिंडर मिळणे अपेक्षित असताना, अनेक भागांत चक्क ४ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.”गॅस बुक करून चार दिवस झाले, तरी वितरकाची गाडी दारात येत नाही. एजन्सीला फोन केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळतात. शेवटी हॉटेलमधून जेवण मागवावे लागत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्राहक अरुण भाबड यांनी व्यक्त केली.
का रखडतेय वितरण? ही आहेत मुख्य कारणे
पुणे शहरात ग्राहकांची संख्या लाखांनी वाढली आहे, मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा तोकड्या पडत आहेत. वितरकांनी खालील समस्यांकडे लक्ष वेधले आहे:
1) वाहतूक कोंडी : पुण्यातील वाढत्या ट्रॅफिकमुळे गॅस वाहून नेणाऱ्या गाड्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास प्रचंड विलंब होत आहे.
2) मनुष्यबळाचा अभाव : सिलिंडर पोहोचवणाऱ्या कामगारांची कमतरता जाणवत आहे.
3) वाढीव मागणी : उन्हाळ्यामुळे पाण्याचे हिटर आणि इतर कारणांसाठी गॅसचा वापर वाढला असून, मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.
4) तांत्रिक बिघाड: अनेकदा बुकिंग प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने वितरकांपर्यंत माहिती पोहोचण्यास विलंब होत आहे.
हॉटेलिंगलाही महागाईचा ‘चटका’
केवळ घरगुतीच नव्हे, तर व्यावसायिक सिलिंडरच्या वाढत्या दरांनी पुण्यातील हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ मालकांचे कंबरडे मोडले आहे. गॅस दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा थेट फटका बाहेर जेवणाऱ्या मध्यमवर्गीय पुणेकरांच्या खिशाला बसत आहे.
“गॅस सिलिंडरबाबतच्या तक्रारींचे प्रमाण आता हळूहळू कमी होत आहे. काही विशिष्ट भागांत तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला असू शकतो, मात्र प्रशासन तेल कंपन्यांच्या संपर्कात आहे. परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.” – महेश सुधलकर (जिल्हा पुरवठा अधिकारी)
हे सुद्धा वाचा : ‘राजगड’, ‘घोडगंगा’सह सात साखर कारखान्यांना केंद्राचा झटका; कर्जाचे प्रस्ताव फेटाळले






