पुण्यात पावसाची हजेरी (फोटो- ai gemini)
पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी
पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण
पुणे: पुणे शहरात सोमवारी (ता. २०) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारी बाराच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असून, पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील आणि लगतच्या उत्तर किनारी आंध्र प्रदेशावरील चक्रीय स्थितीपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर द्रोणी (ट्रफ) विस्तारलेली आहे. ही द्रोणी महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण गुजरात मार्गे जात असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर अधिक राहिला. घाट विभागात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुणे शहरात सोमवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मंगळवारी (ता.२१) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून, कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. शहराचे कमाल तापमान ३० अंश आणि कोमल २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुणे जिल्ह्यातील पावसाची नोंद
(२० जुलै २०२६ – सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०)
ठिकाण – पाऊस (मिमी)
कुरवंडे – ४३.५
भोर – २०.५
गिरिवन – १२.५
माळीण – ४.०
एनडीए – ४.०
निमगिरी – ३.०
चिंचवड – २.५
राजगुरुनगर – १.५
हवेली – १.५
शिरूर – १.०
बारामती – १.०
दुधुळगाव – ०.५
पाषाण – ०.४
शिवाजीनगर – ०.४
Monsoon Update : मान्सूनचा जोर वाढणार? ISRO ‘त्या’ फोटोमुळे वाढली चिंता
अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता
देशातील अनेक राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तापमान लक्षणीयरीत्या खाली आले आहे. परिणामी, लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आता हवामान विभागाने पुढील ६-७ दिवस देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, २० जुलै रोजी देशातील १७ राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. अनेक ठिकाणी पाणी साचणे, भूस्खलन आणि सखल भागांमध्ये पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.






