पोलिस महासंचालकांचा संशयास्पद मृत्यू; पोलीस मुख्यालयातील कार्यालयात आढळला मृतदेह (File Photo : Suicide)
अगरतळा : त्रिपुराचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अनुराग धनखड यांचा संशयास्पद मृत्यू झाला. राज्याच्या पोलीस मुख्यालयातील कार्यालयात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे. धनखड यांचा अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या धनखड यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट न झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अनुराग धनखड यांनी आपल्या सेवाकाळातील मोठा कालावधी त्रिपुरात विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत घालवला. राज्यात जवळपास १६ वर्षे त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे आणि पोलीस प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. नुकतीच त्यांची त्रिपुराच्या डीजीपीपदी नियुक्ती झाली होती. सीबीआयमध्ये कार्यरत असताना धनखड यांनी नीरव मोदीशी संबंधित पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. सुमारे १३ हजार कोटींच्या या बँक घोटाळ्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीबीआयमधील दीर्घ सेवाकाळात त्यांची कुशल आणि निष्पक्ष तपास अधिकारी अशी ओळख निर्माण झाली होती.
दरम्यान, धनखड हे अगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयातील शौचालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या त्यांना जी. बी. पंत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
हरियाणात IPS अधिकाऱ्याची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, हरियाणाचे एडीजीपी वाय. एस. पुरण यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पुरण यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानाचा परिसर सील केला असून, तपास सुरू केला. पुरण यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण पोलिस विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.






