सौजन्य - नवराष्ट्र टीम
कदमवाकवस्ती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपींना दोन दिवसांच्या आत अटक करून कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिला आहे.
म्हातोबा आळंदी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विकास लवांडे यांच्या वाहनाचा पाठलाग करत काही जणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर संग्राम भंडारे, अक्षय कांचन (रा. उरुळी कांचन) तसेच इतर १० ते १२ जणांनी त्यांच्या अंगावर काळी शाई फेकत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जमा झाले. आमदार रोहित पवार यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन लवांडे यांची भेट घेतली आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आमदार पवार म्हणाले की, “आम्ही पोलिसांच्या वर्दीचा आदर करतो म्हणून प्रशासनाला दोन दिवसांचा वेळ दिला आहे. पोलिसांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले असून, दोन दिवसांत आरोपींवर कारवाई होईल, वाहने ताब्यात घेतली जातील आणि बंदुकीसंदर्भातील आरोपांचीही चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. मात्र ठोस कारवाई झाली नाही तर दोन दिवसांनंतर सकाळी १० ते ११ या वेळेत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकारामागे ‘भोंदू महाराज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीसह काही सराईत गुन्हेगारांचा सहभाग आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले.
विकास लवांडे यांच्यावर दुग्धाभिषेक
या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच विकास लवांडे यांच्यावर दुग्धाभिषेक करत निषेध व्यक्त केला. शाईने माखलेल्या कपड्यांवर दुधाचा अभिषेक करत “शाईफेक करून आमचा आवाज दाबता येणार नाही,” अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी हा हल्ला लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
हे सुद्धा वाचा : ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल…
शाईफेकप्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकप्रकरणात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात संग्राम भंडारे, अक्षय कांचन (रा. ऊरळी कांचन, ता. हवेली) यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विकास लवांडे (वय ५४, रा. अष्टापूर, ता. हवेली) यांनी तक्रार दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली.






